Sunday, November 22, 2026
Homeक्राईमNashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक; म्हसरूळ पोलिसांनी...

Nashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक; म्हसरूळ पोलिसांनी संशयिताला ठोकल्या बेड्या

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvti

नोकरी (Job) मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ६ लाख ४५ हजार ५३१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Fraud) करणाऱ्या अट्टल सायबर भामट्याला म्हसरूळ पोलिसांनी बदलापूर पूर्व (जि. ठाणे) येथून मुसक्या आवळल्या आहेत. राहुल दीपक धुळे ऊर्फ अमोल सोनवणे (वय २४, रा. जुवेली गाव, बदलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. प्राथमिक तपासात आरोपीविरोधात राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर (NCCRP) देशभरातून विविध सायबर फसवणुकीच्या तब्बल ३८ तक्रारी नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

‘वर्क इंडिया’वरून जाळ्यात ओढले

पोलीसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘वर्क इंडिया’ (Work India) या प्रसिद्ध जॉब वेबसाइटवर बनावट प्रोफाइल तयार केले होते. फिर्यादीला चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने विविध टप्प्यांवर, वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले. अशा प्रकारे आरोपीने फिर्यादीची ६ लाख ४५ हजार ५३१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी रचला सापळा

सायबर फसवणुकीचे (Cyber Fraud) गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिले होते. त्याअनुषंगाने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धीरज गवारे यांनी तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडींचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले असता आरोपी बदलापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. म्हसरूळ पोलिसांच्या पथकाने बदलापूर पूर्व येथे जाऊन सापळा रचला आणि आरोपी राहुल धुळे याला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात डिजिटल मुद्देमाल जप्त

आरोपीच्या ताब्यातून ४ मोबाईल फोन, १३ सिमकार्ड, विविध बँकांची १२ डेबिट व क्रेडिट कार्ड आणि २ चेकबुक असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या साहित्याचा वापर करून त्याने देशात अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे नागरिकांना गंडा घातला आहे का, याचा कसून तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.

यांनी केली कारवाई

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे, पोलीस हवालदार देवराम चव्हाण, पोलीस अंमलदार स्वप्निल गांगुर्डे आणि म्हसरूळ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...