Sunday, June 7, 2026
Homeक्राईम​Nashik Crime News : चोरांच्या पाऊलखुणा हुडकणारा पोलिसांचा 'गूगल'; एका वासावर उघड...

​Nashik Crime News : चोरांच्या पाऊलखुणा हुडकणारा पोलिसांचा ‘गूगल’; एका वासावर उघड केल्या दाेन घरफोडी, १८ लाखांची चांदीही सापडणार

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​शहरात घरफोड्या आणि दुचाकी चोऱ्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात ‘शिकलगार’ टोळीच्या एका अट्टल गुन्हेगाराला मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) बेड्या ठोकल्या आहेत. अमनसिंग पंजाबसिंग टाक (रा. भिमवाडी, भद्रकाली) असे अटक (Arrested) केलेल्या संशयिताचे नाव आहे. या कारवाईमुळे दोन मोठ्या घरफोड्यांचा छडा लागला असून, तब्बल १९.५ किलो चांदीची लगड आणि १५ तोळे सोन्याची उकल जवळपास झाली आहे. मात्र, या संपूर्ण तपासात पडद्यामागील खरा ‘हिरो’ ठरला आहे तो म्हणजे नाशिक शहर पोलिसांच्या श्वान पथकातील ‘गूगल’ श्वान.

- Advertisement -

रितेश सुंदरलाल शाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ मे रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. शिंगाडा तलाव येथील गुरुद्वाराजवळील चंदनबाला साेसायटीत घडलेल्या या घरफाेडीची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तेव्हा घटनास्थळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी हॅन्डलर व अमलदार गणेश काेंडे यांना ‘गूगल’ श्वानाने चाेराच्या पाऊलखुणा दाखविल्या. गूगलने तीक्ष्ण घ्राणेंद्रियाच्या (वास ओळखण्याची व घेण्याची क्षमता) जोरावर शिंगाडा तलाव या घटनास्थळापासून थेट गंजमाळ झोपडपट्टीपर्यंत चोरट्याचा माग काढला. ‘गूगल’ने दाखवलेली ही दिशा आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज व गोपनीय माहितीचा ताळमेळ लावल्यानंतर, संशयित याच भागातील असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.

त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक उपनिरीक्षक देविदास गाढवे व अंमलदार आकाश सोनवणे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून अमनसिंग टाक याला त्याच्या घरातून (House) ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पहिल्या गुन्ह्यातील १ हजार ३१ ग्रॅम वजनाची चांदीची लगड पोलिसांनी जप्त केली आहे. पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर आणि वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक समद बेग व गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी ही कारवाई केली आहे.

माणसापेक्षा ४० पट अधिक तीव्र शक्ती

​वैज्ञानिकदृष्ट्या माणसाच्या तुलनेत श्वानांची घ्राणेंद्रिय शक्ती ४० पटीने अधिक तीव्र असते. म्हणूनच ते जमिनीखाली गाडलेली स्फोटके, अमली पदार्थ किंवा कित्येक दिवस जुना वासही सहज ओळखू शकतात. नाशिक पोलिसांच्या या ‘गूगल’नेही अगदी इंटरनेटवरील सर्च इंजिनसारखाच अचूक माग काढत पोलिसांचा तपासाचा वेळ वाचवला आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावली.

गंगापूर हद्दीतील १८ लाखांची चांदी होणार रिकव्हर

​अमनसिंग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अधिक चौकशीत त्याने गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेली दुसरी मोठी घरफोडी कबूल केली आहे. या गुन्ह्यात तब्बल १८.५ किलो चांदी व १५ तोळे सोने चोरीला गेले होते. आता गंगापूर पोलिस टाकचा ताबा घेणार असून, या सोन्या-चांदीची रिकव्हरी केली जाईल. त्याचा दुसरा साथीदार सनीसिंग छोटुसिंग जुनी हा सध्या पसार असून त्याचा शोध सुरु आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : “मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन यांच्याकडून माघारीच्या...

0
नाशिक | Nashik नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे मालेगावचे बंडखोर...