नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकरोड येथील बहुचर्चित सुमीत पगारे हत्याकांड प्रकरणात (Summit Pagare Murder Case) नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) मोठी कारवाई केली आहे. संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी पिवाल टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे. तसेच, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील संभाव्य टोळीयुद्ध (गँगवार) आणि रक्तपात ऐनवेळी उधळून लावत पोलिसांनी १२ सराईत संशयितांना परजिल्ह्यांतील तीन वेगवेगळ्या मध्यवर्ती कारागृहांत रवाना केले आहे.
गोसावीवाडी (नाशिकरोड) येथील गंगोत्री जनता स्टोअर्ससमोर १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमीत अरुण पगारे याच्यावर गोळीबार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. हत्येच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष गोळीबार, अग्निस्त्रांचा पुरवठा, वाहतूक आणि गुन्ह्यानंतरच्या (Case) हालचालींपर्यंतचा सखोल तपास पोलिसांनी केला. या तपासादरम्यान टोळीतील सदस्यांची कथित भूमिका व गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन अर्जुन सुरेश पिवाल टोळीवर मोक्का (Mocca) लावण्याचा निर्णय घेतला आहे.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती २३ संशयितांची यादी लागली होती. त्यातील १६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र, मृत सुमीत पगारे याचा भाऊ सनी पगारे आणि त्याचे साथीदार आधीपासूनच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. पिवाल टोळीच्या संशयितांनाही याच तुरुंगात ठेवल्यास भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चार भिंतींच्या आतच दोन्ही गट आमनेसामने येऊन गँगवार भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. हा सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ओळखून नाशिकरोड पोलिसांनी पाऊल उचलत न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या बारा संशयितांची इतर जिल्ह्यांतील कारागृहांत रवानगी केली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत. याशिवाय अग्निशस्त्रांशी संबंधित साहित्य, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, सिमकार्ड आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिवाल टोळीशी संबंधित इतर ७ संशयित अद्याप पसार आहेत. शिवा पिवाल, राहुल सोनवणे, राजु शेख, जमीर रंगरेज, रोशन फेल्टे, रोहित नेरे, दर्शन गांगुर्डे, अमजद उर्फ मामू शेख आणि आदिल सय्यद व इतरांचा समावेश आहे. या पसार संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके परराज्यात व इतर जिल्ह्यांत रवाना करण्यात आली असून त्यांनाही लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
यांची कारवाई
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त (नाशिकरोड) अद्विता शिंदे यांच्या सूचनेने मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनिरीक्षक धनाजी माळोदे आणि पोलीस हवालदार किरण अहिरराव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
यांची ‘या’ कारागृहात रवानगी
- छत्रपती संभाजीनगर कारागृह: अर्जुन पिवाल, आशिष पिवाल, मुन्ना गांगुर्डे आणि पराग कुलकर्णी.
- धुळे कारागृह: राजीफ शेख, निशांत भारती, आयुष भारती, शाहिद शेख, अक्षय गोसावी आणि साद पठाण.
- नंदुरबार कारागृह: साहिल शेख.




