Sunday, November 3, 2024
Homeक्राईमNashik Crime News : छोटी भाभीच्या 'एमडी केस' गुन्ह्याचा तपास पुन्हा एकदा...

Nashik Crime News : छोटी भाभीच्या ‘एमडी केस’ गुन्ह्याचा तपास पुन्हा एकदा पटलावर

नाशिक | प्रतिनिधी
मुंबईमार्गे नाशिकमध्ये एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ‘छोटी भाभी’च्या गुन्ह्याचा तपास अचानक वर्षभरानंतर पुन्हा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. कारण या प्रकरणात नाशिकच्या एनडीपीएस पथकाने शहारातील सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या विशेष ओळखीतील संशयितास तांत्रिक विश्लेषण व पुराव्यांआधारे अटक केली आहे. इरफान शेख नूर मोहम्मद शेख ऊर्फ चिपड्या (रा. सादिकनगर, वडाळागाव) असे संशयिताचे नाव असून सोबतच करण सोनटक्के (रा. नाशिकरोड) यालाही पकडले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक सत्यता पडताळत असून जुन्या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू झाला आहे.

शहर पोलिसांच्या युनिट एकच्या तत्कालीन पथकासह एनडीपीएस आणि विशेष पथकाने एमडी ड्रग्ज विक्री, तस्करी आणि गोदामांशी निगडीत कारवाया केल्या. तेव्हा वडाळागावातील ड्रग्ज डिलिंग आणि छोटी भाभी प्रकरणातील तपास रखडला होता. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेने पुन्हा तपासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तेव्हा कारवाईत जप्त केलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर वरील दोन्ही संशयितांना अटक केली आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी डिसेंबर २०२४ मध्ये नाशिक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर तेव्हाच ड्रग्जमाफिया ललित पानपाटील व ‘छोटी भाभी’ एमडीचे प्रकरण चर्चेत होते. त्याचवेळी कर्णिक यांनी शहरातील सर्व गोदामे, पानटपऱ्या, अंमली पदार्थ विक्री व बाळगणाऱ्या व्यक्तींच्या याद्या करून धाडसत्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक ‘एनडीपीएस’ने एमडी व गांजा तस्करांना बेड्या ठोकल्या. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांसह परजिल्ह्यातील ‘डिलर्स’चा समावेश होता. गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आठ मोबाईलवरून तपास
‘एनडीपीएस’ पथकाने ५ ऑक्टोबर २०२३ रोजी वडाळ्यात छापा मारून ‘एमडी’ तस्कर वसीम रफीक शेख (३६) व नसरीन ऊर्फ छोटीभाभी इम्तियाज शेख (३२, रा. सादिकनगर) यांना अटक केली होती. त्यांचे सात-आठ मोबाइल जप्त केले. पुढील तपासात छोटी भाभीचा पती इम्तियाज शेखला जिल्ह्याबाहेरुन, भिवंडीतून सलमान अहमद फलके आणि ठाणे शहरातून शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजीज मेमन यांना अटक केली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये, वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, दिवाणसिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत फड यांच्या पथकाने छोटी भाभी, ललित पानपाटील, सनी पगारे टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, आता आठही मोबाईलचे विश्लेषण करता त्यात संबंधित लोकप्रतिनिधी व इरफान शेख यांच्यामध्ये संशयास्पद संवाद झाल्याचे कळते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या