नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थाचे ध्वजारोहण आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पार पडलेल्या ३१ ऑक्टाेबरच्या नाशिक दौऱ्यात (Nashik Tour) शहरात सुरक्षेचा आणि बंदोबस्ताचा प्रश्न संवेदनशील बनला हाेता. याच वातावरणाचा गैरफायदा घेऊन सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणे, लाईक्स आणि व्ह्यूव्ज मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक बनावट (स्टेज्ड) घटना घडवून त्याचे चित्रीकरण करणे महिलेसह तिघांना महागात पडले आहे. नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) या प्रकाराची गंभीर दखल घेत स्टंटबाजी करणाऱ्या आणि खोटे व्हीडिओ तयार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर बडगा उगारला आहे.
सोशल मीडियावर रिल्स (Social Media Reels) व्हायरल करून प्रचंड प्रसिद्धी, फॉलोअर्स आणि व्ह्युज मिळवण्याच्या नादात काही जणांनी पोलिसांच्या बंदोबस्ताविषयी किंवा शहरातील विविध मुद्यांवर खोटे आणि दिशाभूल करणारे व्हीडिओ तयार केले. प्रत्यक्षात असे प्रकार घडलेले नसताना, केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी पूर्वनियोजितरीत्या काही घटना घडवून आणल्याचे तपासात उघड झाले.
हा प्रकार केवळ अफवा पसरवणारा नसून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा असल्यामुळे नाशिक पोलिसांनी (Nashik Police) याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले. काही संशयितांनी सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आपली चूक लक्षात आल्याचे भासवून माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त करणारे व्हीडिओ अपलोड केले. मात्र, नाशिक शहर पोलिसांनी ही ‘माफी’ फेटाळून लावत थेट माफी स्विकारणार नाही, असा संदेश दिला आहे. केवळ माफी मागून सोडून न देता अशा संशयितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाेलिसांचे आवाहन
शहर पोलिसांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून स्पष्ट इशारा दिला आहे. रचनात्मक टीकेचे स्वागत आहे, परंतु कोणत्याही कार्यक्रमात किंवा बंदोबस्तात विघ्न आणण्यासाठी जाणूनबुजून गोंधळ किंवा स्टंट करणे खपवून घेतले जाणार नाही. सोशल मीडियावर व्ह्युज आणि लाईक्ससाठी खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना आता कसलीही पूर्वसूचना दिली जाणार नाही, तर थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी केवळ लाईक्स व व्ह्युज मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक एडिट करून किंवा स्टंट करून तयार केलेल्या खोट्या व्हीडिओवर आणि अफवांवर विश्वास ठेवून, त्यांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




