मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार का? या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे इतर विरोधी राजकीय पक्षांसह महायुतीमधील मित्रपक्षांत चलबिचल निर्माण झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण देत विलीनिकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, “विलीनीकरणाच्या (Merger) चर्चांचा मला आता कंटाळा आला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलीनिकरणाची चर्चा होती आणि तारीखही ठरली होती. पण ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी या विषयावर माझ्या मनात आणि पक्षात ‘फुल स्टॉप’ (पूर्णविराम) लागला,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. तसेच “विलीनिकरणाबाबत जे काही ठरले होते ते अजितदादांसोबत ठरले होते. त्यामुळे आता विलीनिकरणा संदर्भातील चर्चांना पूर्णविराम द्यायला हवा”, असे सुळे म्हणाल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींवर स्पष्टीकरण
अजित पवार गटातील नेत्यांच्या भेटीगाठींवरून सुरू असलेल्या राजकीय तर्कवितर्कांनाही सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, “छगन भुजबळ वयाने ८० वर्षांचे आहेत, सुनील तटकरे ५० वर्षे राजकारणात आहेत, तर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार साहेबांसोबत काम केले आहे. हे सर्व नेते वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान राखणे हे माझे संस्कार आहेत. भुजबळ आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. चांगल्या-वाईट काळात आम्ही एकत्र राहिलो आहोत. सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र नाती कायम टिकतात. राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे भेटीगाठी होत असतात, पण आमच्या बैठका या केवळ लोकांच्या कामांसाठी होत्या, असेही सुळे यांनी म्हटले.
जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याचे आवाहन
राजकीय चर्चांपेक्षा राज्यासमोर सध्या महागाई, दुष्काळ आणि धोरणात्मक निर्णय (पॉलिसी मेकिंग) असे अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेसाठी असल्याचे सुळे यांनी अधोरेखित केले. “विलीनीकरणावर आज जे विचारायचे ते विचारून घ्या, यापुढे मी या विषयावर शांत बसेन आणि पुन्हा कधीही बोलणार नाही,” असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकला.
सुनेत्रा पवारांचा विलिनीकरणाला विरोध?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना दोन्ही पक्ष एकत्र आलेले नको आहेत. याबाबत खुद्द सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महायुतीच्या प्रमुखांना आपली भूमिका स्पष्ट केल्याचे बोलले जाते. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भविष्यात आमच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सध्या तरी विलीनिकरणाला आमची मान्यता नाही, असे त्यांनी एनडीएतील वरिष्ठ नेत्यांना कळवले असल्याचे सांगितले जाते.
स्वतंत्र घटकपक्षास हरकत नाही – सुनेत्रा पवार
दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी (NCP Sharad Pawar) जर महायुतीचा स्वतंत्र घटक पक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी होणार असेल, तर त्यास आमचा विरोध असणार नाही, अशी भूमिकाही सुनेत्रा पवार यांच्यावतीने मांडण्यात आल्याचे बोलले जाते. विलीनिकरणातील या अडचणी पाहता, शरद पवार गटाकडून आता विलीनिकरणाऐवजी स्वतंत्र पक्ष म्हणून सत्तेत जाण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.




