नाशिक | प्रतिनिधी | Nashik
घरफोडी करायची, थेट निर्जन भागात कार उभी करून रात्रभर त्यातच झोपायचे आणि सकाळी चोरीचे सोने मुंबई-विरारच्या (Mumbai and Virar) सराफांना विकून मोकळे व्हायचे… नाशिक शहरात (Nashik City) गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मुंबईच्या एका चाेर टोळीची ही मोडस ऑपरेंडी आता उघड झाली आहे. जयभवानी रोडवरील एका चोरीचा माग काढताना उघडकीस आलेल्या या प्रकारात तब्बल २० तोळे सोने (सोन्याची लगड), कार, दुचाकी व शस्त्रांसह २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून शहरातील ११ घरफोड्यांची उकल झाली आहे.
जयभवानी रोडवरील (Jay Bhavani Road) योगेश्वर नंदन अपार्टमेंटमध्ये राहणारे हेमंत सोनवणे यांच्या घरी महिनाभरापूर्वी घरफोडी झाली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने परिसरातील सर्व लहान-मोठ्या गल्ल्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी वेगवेगळ्या गल्लीबोळात एकच संशयित कार आणि दुचाकी वारंवार फिरताना दिसली. या कारच्या नंबरवरून धागेधोरे शोधत पोलीस थेट मुंबईतील मानखुर्दपर्यंत पोहोचले. तेथून संजय कांबळे उर्फ सलीम अब्दुल लतीफ शेख (४५, रा. दिवा) याला ताब्यात घेण्यात आले.
मानखुर्दमध्ये (Mankhurd) पकडलेल्या कांबळेच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, टोळीतील इतर तीन साथीदार शिर्डी-मनमाड मार्गाने नाशिकच्या दिशेने येत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आडगाव ट्रक टर्मिनल येथे सापळा रचला. एकाच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे विनोद अशोक पवार (रा. कुलाबा, मुंबई), तौसिफ इकबाल गोरमे (रा. रायगड) आणि सद्दाम हुसेन खान (रा. घाटकोपर) या तिघांना आडगावजवळ (Aadgaon) ताब्यात घेण्यात आले.
हॉटेल किंवा लॉज नाही, येथे मुक्काम!
चौकशीत या चौघा अट्टल गुन्हेगारांची चोरी करण्याची आणि पकडले न जाण्याची वेगळीच पद्धत समोर आली आहे. ही टोळी केवळ घरफोडीच करत नव्हती, तर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून मुद्देमाल लांबवणे, तसेच तोतया पोलीस बनून नागरिकांची फसवणूक करण्यातही सराईत होती. दिवसा किंवा रात्री घरफोडी केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी हे चौघे शहरात कोणत्याही लॉज किंवा हॉटेलमध्ये थांबत नसत. निर्जन भागात कार पार्क करून रात्रभर कारमध्येच झोपणे पसंत करत हाेते. चोरीनंतर ही टोळी दागिने तात्काळ वितळवून त्याची सोन्याची लगड बनवत हाेते. मानखुर्द येथून १५ तोळे आणि विरार येथून ५ तोळे, अशी एकूण २० तोळे सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.
शहरातील या भागांना केले लक्ष्य
टोळीने नाशिक शहर आणि लगतच्या परिसरात घरफोड्यांचे सत्र चालवले होते. त्यांनी खालील ११ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यात इंदिरानगर येथे ०४, नाशिक रोडला ०३, उपनगरला ०२, देवळाली कॅम्पला एक व कर्जतला एक. सध्या या चौघांना गजाआड करण्यात आले असून, त्यांनी इतर कुठे अशा प्रकारे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.




