नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील येवला तालुक्यातील (Yeola Taluka) देवळाणे येथील बोर्डे पती-पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना (Rural Police) यश आले आहे. केवळ शेतीचा वादच नाही, तर कांद्याचे भरघोस उत्पादन झाल्याचा ‘मत्सर’ या हल्ल्यामागे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी (Police) याप्रकरणी ‘पोलीस मित्र’ चांगदेव देवराम मोरे (४०, रा. देवळाणे) आणि सचिन जालिंदर कोटमे (२०, रा. देवळाणे) यांना अटक (Arrested) केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ८ मे रोजी रात्रीच्या सुमारास भाऊसाहेब बोर्डे आणि कांताबाई बोर्डे हे शेतातील वस्तीवर घराच्या गच्चीवर झोपले होते. गाढ झोपेत असताना अज्ञातांनी त्यांच्या अंगावर अॅसिड ओतले हाेते. यामध्ये पती-पत्नी दोघेही गंभीर भाजले. त्यांच्यावर उपचार सुरू असून येवला तालुका पोलीस ठाण्यात (Yeola Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित चांगदेव मोरे आणि बोर्डे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होताच. मात्र, यावर्षी भाऊसाहेब बोर्डे यांनी शेतात कांद्याचे (Onion) पीक घेतले होते. पीक चांगले आल्याने आणि बोर्डे यांच्याकडे पैसा येणार या विचाराने माेरेच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. “आपल्यापेक्षा शेजारी प्रगती कसा करताेय?” या विकृत मानसिकतेतून आणि मत्सरातून त्याने कांताबाई आणि त्यांच्या पतीवर अॅसिड फेकून त्यांना कायमचे विद्रूप करण्याचा कट रचला.
बनावट चिठ्ठी अन् पोलीस मित्र
चांगदेव मोरे हा स्वतःला ‘पोलीस मित्र’ म्हणवून घेत हाेता. त्यामुळे तपासाची दिशा कशी भरकटवायची याची त्याला कल्पना होती. त्याने तपासाचा संशय वळवण्यासाठी घटनेच्या ठिकाणी एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावाची चिठ्ठी मुद्दाम टाकली. गुन्हा केल्यावर तो स्वतः पोलिसांसोबत मदतीचा आव आणून फिरत होता, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मात्र, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि त्यांच्या पथकाने अत्यंत बारकाईने तपास केला. चांगदेवची बोलण्यातील विसंगती आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला पुतण्या सचिन कोटमे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
अंधारातील शोध आणि पोलिसांचे यश
हा परिसर पूर्णतः शेतीचा (मळ्यांचा) असल्याने आणि रात्रीच्या वेळी संशयित पसार झाल्याने त्यांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, येवला तालुक्याचे निरीक्षक संदीप मंडलिक आणि त्यांच्या पथकाने कौशल्याने तपास करत या दाेघांना बेड्या ठोकल्या.





