पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
विवाहितेकडे चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी आणि एकूण १० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) सुनावली आहे. तर पुराव्याअभावी सासू आणि सासऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर २०२३ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत रामवाडी, पंचवटी येथील आदर्शनगर येथे ही घटना घडली होती. आशा मनोज क्षीरसागर (रा. हनुमान टेकडी, मोराबाद, जि. सुरत) यांची मुलगी पूनम हिचा विवाह प्रदीप दिलीप गाजरे (वय २६, रा. छडवेल कोरडे, ता. साक्री, जि. धुळे; सध्या रा. रामवाडी, पंचवटी) याच्याशी झाला होता. लग्नानंतर पतीने चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची वारंवार मागणी केली. पैसे (Money) न आणल्याने चारित्र्यावर संशय घेऊन वायरने मारहाण करणे तसेच शारीरिक व मानसिक छळ करणे सुरू केले.
या हुंड्याच्या मागणीला आणि छळाला कंटाळून पूनम यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchvati Police Station) तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. एन. सोनवणे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयचे न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांनी साक्षीदार, पुरावे व तपासाच्या आधारे पती प्रदीप गाजरे याला दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व रु. ५,००० दंड शिक्षा सुनावली आहे.
याच खटल्यातील आरोपी सासरे दिलीप रतन गाजरे व सासू-विजया दिलीप गाजरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात (Case) व्ही. व्ही. व्यवहारे, आर. व्ही. गायकवाड यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोहवा सुधाकर गायकवाड, सोमनाथ गावित, विक्रांत नागरे यांनी पाठपुरावा केला.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.




