मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) गर्भवती राहिलेल्या १६ वर्षीय मुलीची बेकायदेशीर प्रसुती करून तिच्या बाळाला विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवून घेतल्याने चौघा डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा (Case) दाखल करत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
दि. ३ जून रोजी शहरातील हिराई रूग्णालयात (Hospital) संजय भागवत गवळी, नंदिनी गवळी, प्रवीण देशमुख यांनी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीला प्रसूतीसाठी दाखल केले होते. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही डॉ. डांगे व डॉ. किशोरी डांगे यांच्या सांगण्यावरून रूग्णालयात नियुक्तीस असलेल्या डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रीती जाधव, कर्मचारी नवसिन रफिक शेख, मोहंमद फईम मोहंमद शफिक, सार्थक प्रवीण जगताप यांनी तिची सिझरियनद्वारे प्रसुती केली. प्रसुतीनंतर जन्मलेल्या बाळाची विक्री करण्याच्या हेतूने त्याची ओळख लपविण्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
मालेगाव (Malegaon) येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली असता त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी सदर मुलीला गर्भवती करणाऱ्या अनोळखी तरूणासह संजय गवळी, प्रवीण देशमुख, नंदिनी गवळी, हिरा रूग्णालयाचे (Hospital) संचालक डॉ किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रिती जाधव, रूग्णालय कर्मचारी नवसिन शेख, मोहंमद फईम सार्थक जगताप यांच्याविरूध पोक्सो व अन्य कायद्यान्वये गुन्ह दाखल केला आहे. यातील दोघे फरार असून अटक करण्यात आलेल्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे.




