नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बारावीच्या परीक्षेनंतर (HSC Exam) विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी दि.०३ मे २०२६ रोजी नीट परीक्षाही घेण्यात आली. मात्र, या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे आता नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास सीबीआयकडून (CBI) करण्यात येणार आहे. दरम्यान, या पेपर फुटीप्रकरणी राजस्थान पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इंदिरानगर भागातून (Indiranagar Area) एकास ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये (Nashik) तयार करण्यात आली होती. हीच प्रत हरियाणाला (Haryana) पोहोचली,जिथे या फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचे १० संच तयार करण्यात आले. त्यानंतर ही फुटलेली प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश,जम्मू-काश्मीर आणि राजस्थान या राज्यांमध्ये पोहोचली. याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून तो बीएमएसचे शिक्षण घेत असल्याचे समजते.
हे देखील वाचा : मोठी बातमी! २०२६ मध्ये घेण्यात आलेली NEET ची परीक्षा रद्द; CBI चौकशीचे आदेश
दरम्यान, सध्या राजस्थान पोलीस (Rajsthan Police) आणि गुन्हे शाखेकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणी देशभरातील विविध ठिकाणाहून १६ संशयिताना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यामुळे यात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
परीक्षेची नवी तारीख लवकरच
पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र ३ मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तसेच विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही. मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ८ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
नाशिक जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात दि.०३ मे रोजी नीटची परीक्षा सुरळीत पार पडली होती. यंदा नीटसाठी ९ हजार १२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,८५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर २७३ जणांनी परीक्षेस दांडी मारली होती.





