Thursday, October 15, 2026
HomeनाशिकNashik Crime News : भाषिक कौशल्य अन् संवादाचा बनाव; एसटी बसमध्ये वयोवृद्धांना...

Nashik Crime News : भाषिक कौशल्य अन् संवादाचा बनाव; एसटी बसमध्ये वयोवृद्धांना हेरणारी बिजनौरची सराईत दुकली गजाआड

२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘मदत करतो, काळजी करू नका, बॅग वर रॅकमध्ये ठेवून देतो… या आणि अशा आपुलकीच्या गोड शब्दांत ज्येष्ठ प्रवाशांना जाळ्यात ओढून बसस्थानकांवर चोऱ्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील एका आंतरराज्यीय चाेरट्यांच्या जोडीचा गुन्हे शाखा युनिट एकने (Crime Branch Unit One) पर्दाफाश केला आहे. भाषेचे प्रभुत्व, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आलटून-पालटून पाळत ठेवून झोपणे आणि थेट परराज्यात सोने नेऊन वितळवणे, अशा अट्टल आणि अनोख्या मोडस ऑपरेंडीचा वापर करणाऱ्या या दोघांना २४ लाख ४३ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

जावेद अब्दुल गफ्फार (वय ४०, रा. एरसेल टॉवरच्या मागे, मोहल्ला चाहशिरीन, जि. बिजनौर, उत्तर प्रदेश) व अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (वय ५६, रा. सिकरी बुजुर्ग, जि. बिजनौर, उत्तर प्रदेश) अशी संशयितांची (Suspected) नावे आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी मूळचे हातमजूर असणाऱ्या या दोघा संशयितांनी चोऱ्यांसाठी एक वेगळीच युक्ती शोधून काढली होती. प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी मराठी, हिंदी आणि उर्दू या तिन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धुळे व जळगावकडे जाणाऱ्या केवळ वयोवृद्ध प्रवाशांनाच ते लक्ष्य करत हाेते.

वृद्ध प्रवासी दिसताच त्याच्याशी त्याच्याच भाषेत संवाद साधून विश्वासात घेऊन आणि बसमध्ये बँग, साहित्य रॅकमध्ये ठेवण्याच्या बहाण्याने बॅग वरूनच चाचपडून पाहिल्यावर बॅगेत सोन्याचे दागिने किंवा रोकड असल्याचे स्पष्ट होताच ती लांबवून अर्ध्या रस्त्यातच बसमधून उतरून पसार हाेत हाेते. मेळा स्थानक आणि ठक्कर बझार परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि संशयितांच्या संशयास्पद हालचाली टिपत गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक विश्वास चव्हाणके, जया तारडे, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, हवालदार संदीप भांड, विशाल देवरे, महेश साळुंके, प्रदीप म्हसदे, मिलिंदसिंह परदेशी, नाझिमखान पठाण, अमलदार आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, मुक्तार शेख, राहुल पालखेडे, जगेश्वर बाेरसे यांच्यासह पथकाने केली.

​जागून पाळत अन् १५ दिवसांचे टार्गेट

​नाशिकमधील मेळा स्थानक आणि ठक्कर बझार परिसरात हे चाेरटे सकाळी सकाळी सक्रिय असायचे. चोरीचे ठरलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी ते सलग १५ ते २० दिवस नाशिकमध्येच तळ ठोकून राहत हाेते. विशेष म्हणजे, पोलिसांच्या किंवा कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून हे दोघे बसस्थानकावरच झोपायचे. रात्रीच्या वेळी ओळख पटू नये म्हणून एक जण झोपायचा तर दुसरा जागा राहून त्याच्यावर पाळत ठेवायचा. पहिल्याची झोप पूर्ण झाल्यावर दुसरा झोपायचा आणि पहिला जण पहारा द्यायचा. टार्गेट पूर्ण होताच जमा केलेले सोने घेऊन ते उत्तर प्रदेशातील बिजनौरला जायचे आणि तेथे सोने वितळून मिळालेल्या पैशांतून मौजमजा करत हाेते.

​१० गुन्हे उघडकीस; १६३ ग्रॅम सोने जप्त

​दाेघांकडून १६३ ग्रॅम ६६ मिलीग्रॅम असे २४ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान नाशिक शहरातील सरकारवाडा (०७ गुन्हे), पंचवटी (०१ गुन्हा) आणि मुंबई नाका (०२ गुन्हे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या १० चोऱ्यांची कबुली दिली आहे. याआधी त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत. दाेघांनाही न्यायालयाने पाेलीस काेठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Dindori News : दिंडोरी तालुका लवकरच दुष्काळग्रस्त घोषित होणार –...

0
ओझे | विलास ढाकणे | Oze राज्य सरकारने महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध भागांत दुष्काळ जाहीर केला असला तरी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक हे दोन तालुके...