नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून परतलेल्या एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यालाच सायबर चाेरट्यांनी आपल्या जाळ्यात ओढल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे. ‘पार्सल डिलिव्हरी’च्या नावाखाली केवळ एक कोड डायल करायला लावून व्हॉट्सॲप हॅक करण्याचा एक नवा आणि अतिशय घातक ट्रेंड या गुन्ह्यातून समोर आला आहे. लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी कमलेश विश्वविनायकसिंग चौहान (वय ६१, रा. हिलवूड सोसायटी) यांच्या तक्रारीवरून नाशिक शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आतापर्यंत सायबर संशयित ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती मागून फसवणूक करत होते. मात्र, या घटनेत ‘कॉल फॉरवर्डिंग’ या तांत्रिक सुविधेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. फिर्यादी चाैहान यांना ‘ब्लू डार्ट’ कुरिअरचा प्रतिनिधी असल्याचे सांगून फोन आला. “तुमचा पत्ता सापडत नाही, मी पाठवतो तो कोड डायल करा,” असे त्यांना सांगण्यात आले. चौहान यांनी तो कोड डायल करताच, त्यांच्या मोबाईलवर येणारे सर्व कॉल्स आणि एसएमएस नकळतपणे सायबर भामट्याच्या नंबरवर ‘फॉरवर्ड’ झाले. या फॉरवर्डिंगचा फायदा घेऊन चाेरट्यांनी चौहान यांचे व्हॉट्सॲप स्वतःकडे सुरू केले. व्हॉट्सॲप व्हेरिफिकेशनचा ‘ओटीपी’ चौहान यांच्याऐवजी थेट भामट्याला मिळाला आणि चौहान यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले.
व्हॉट्सॲपचा ताबा मिळवताच चाेरट्याने चौहान यांच्या प्रोफाईलवरून त्यांच्या लष्करातील वरिष्ठ मित्र आणि नातेवाईकांना तातडीने पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवले. एका लष्करी अधिकाऱ्याचा मेसेज असल्याने समोरच्या मित्रांनी कोणतीही शंका घेतली नाही. देवळालीतील डॅनियल मेन्सी यांनी २३ हजार, तर थेट लेह (लडाख) येथील कर्नल क्षितिज चौहान यांनी ३५ हजार रुपये चाेरट्याने दिलेल्या यूपीआय आयडीवर ट्रान्सफर केले. एकूण ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सायबर पोलिसांचा इशारा
“मोबाईल कंपन्यांचे ४०१ किंवा तत्सम कोड अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कधीही डायल करू नका. हा कॉल फॉरवर्डिंगचा सापळा असू शकतो. तुमच्या व्हॉट्सॲपवर मित्राने पैसे मागितल्यास आधी त्याला थेट फोन करून खात्री करा.” या घटनेने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असून, लष्करी अधिकाऱ्यांनाही चकवणारी ही टोळी शोधण्याचे मोठे आव्हान नाशिक सायबर पोलिसांसमोर आहे.




