नाशिक | प्रतिनिधी
दुचाकीवरील सोनसाखळी चोरट्यांनी (Chain snatcher) शहर पोलिसांच्या (Nashik Police) नाकावर टिच्चून काही मिनिटांत एक, दोन नव्हेतर तब्बल सात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका घटनेत चोरट्यांनी प्रतिकार करणाऱ्या महिलेस काही अंतरावर फरफटत नेत जखमी केल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची स्टॉप अॅण्ड सर्च मोहीम सुरु केली असतानाच एकही चेनस्नॅचर हाती आलेला नाही. या घटना करुन पोलिसांना आव्हान देणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांनी दोन ठिकाणी पोलिसांना हुलकावणी देत पोबारा केला आहे. आडगाव हद्दीत तीन घटना घडल्या असून, पहिल्या घटनेत अश्विनी राहुल सम्राट (३४, रा. आशापुरी हौसिंग सोसायटी, धात्रक फाटा, पंचवटी) या सकाळी साडेसातच्या सुमारास मुलांना शाळेत सोडविण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटल ते धात्रक फाटा यादरम्यान असलेल्या वंदन अपार्टमेंटसमोर स्कूल बसची प्रतीक्षा करीत थांबलेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून पोबारा केला. काही अंतरावर पुन्हा विजया भरत गांगुर्डे यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.
तिसरी घटना जत्रा हॉटेल लिंकरोडवरील संजीवनी ब्लँकेट हॉलसमोर घडली. रिना अशोक कंगले (४७, रा. एच.एन. एन्के लेव्ह, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्या विवाह सोहळ्यासाठी कारमधून आल्या. कार पार्क करून त्या हॉलकडे पायी जात असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील १ लाख २६ हजारांची सोन्याची पोत खेचून पोबारा केला. चौथी घटना गंगापूर हद्दीत घडली. सुनिता राजेंद्र शिंपी (५०, रा. बजरंग चौक, दत्तचौक) यांच्या फिर्यादीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास मोपेडवरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ४० हजारांची पोत खेचून पोबारा केला.
दोन घटना इंदिरानगर हद्दीत घडल्या असून, सरला ईश्वर सोनवणे (५७, रा. वासननगर, पाथर्डी फाटा) या रो हाऊससमोर सकाळी आठच्या सुमारास साफसफाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांची ७० हजारांची सोन्याची पोत खेचून नेली. तर काही अंतरावर पुन्हा एका महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची पोत खेचून नेली. शोभा भगवान पाटील (५८, रा. प्रसाद बंगला, मराठा नगर, जेलरोड) या रात्री सव्वा आठच्या सुमारास स्वाध्याय केंद्रातून कॉलनीतील एका महिलेच्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका भामट्याने त्यांच्याकडे वृंदावन सोसायटी कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी दुसऱ्या महिलेने इकडे नाही, तिकडे दुसरीकडे असेल असे सांगितले. त्यावेळी संशयिताने दुचाकी वळवली आणि बंगल्याच्या गेटकडे जाणाऱ्या पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून सैलानी बाबा स्टॉपकडे पोबारा केला. यावेळी पाटील यांनी सावध होत पोत धरून प्रतिकार केला असता संशयिताने त्यांच्या पोटात मारले व काही अंतर त्यांना फरफटत नेले. यामुळे त्यांना दुखापतही झाली आहे. नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.