नाशिक । प्रतिनिधी | Nashik
तब्बल १६० कोटी रूपयांच्या बनावट ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) आता बड्या माशांभोवती कायद्याचा फास अधिक घट्ट झाला आहे. गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता नाशिकरोड अतिरिक्त न्यायालयाने (Court) हा खटला आता सत्र न्यायालयाकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातील सर्व अटक संशयितांना २९ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या या भूमिकेमुळे आणि पोलिसांच्या कारवाईमुळे घोटाळ्यात अडकलेल्या संशयितांचे धाबे दणाणले आहेत.
या घोटाळ्यात नाशिक विभागातील (Nashik Division) तब्बल ८४१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील ६३८ कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आतापर्यंत तब्बल १ हजार १९९ संशयित समोर आले आहेत. या प्रकरणातील तत्कालीन शिक्षण उपसंचालक संशयित भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह १४ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड अतिरिक्त न्यायालयाने यापूर्वीच फेटाळले आहेत.
जामीन फेटाळताना न्यायालयाने (Court) दिलेली टिप्पणी गंभीर आहे. ”ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृत्य घडते, तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही; तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्रीय भविष्याचा पायाच ढासळतो.न्यायालयाच्या या भूमिकेनंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हा खटला आता वरिष्ठ पातळीवर म्हणजेच सत्र न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव
नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात पोलिसांनी थेट मुख्य सूत्रधारांवर हात घातला आहे. आतापर्यंत या प्रकरणी ७ प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात नितीन उपासनी (माजी अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ), शशिकांत हिंगोणेकर (माजी शिक्षणाधिकारी) संजय गरूड (शिक्षण संस्थाचालक व भाजप पदाधिकारी), दीपक गरूड (संस्थाचालक), प्रशांत वाडीले (मध्यस्थ व संस्थाचालक) किरण पाटील व राहुल पवार यांचा समावेश आहे. आता सहभागी इतर अधिकारी, कर्मचारी व मध्यस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धावाधाव सुरु केली आहे.
उपासनींवर संदर्भ रुग्णालयात उपचार
माजी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी याला वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार हृदयाशी संबंधित उपचारासाठी संदर्भ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सुनावणीस तो अनुपस्थित होता. संशयित किरण पाटील याला प्रत्यक्ष, तर राहुल पवार याला मध्यवर्ती कारागृहातून व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते. आता सर्वांच्या नजरा २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लागल्या आहेत.




