नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या बहुचर्चित ‘शालार्थ’ घोटाळ्याच्या तपासात शिक्षण विभागाकडून आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्याने तपासावर परिणाम होत असल्याचे समजते. विविध शिक्षण कार्यालयांकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अपेक्षित नोंदी व अभिलेख मिळण्यात विलंब होत असल्याने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत ‘एसआयटी’ने संशय व्यक्त केला असून आता तपासाची सूत्रे गोपनीय पद्धतीने फिरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाखल झालेल्या गुन्ह्यात नाशिक विभागातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘शालार्थ आयडी’ बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तब्बल ६३८ प्रकरणे जळगाव जिल्ह्यातील असल्याने तपासाची व्याप्ती मोठी झाली आहे. या प्रकरणात विविध नियुक्त्या, मंजुरी आदेश, वेतन नोंदी, शालार्थ प्रवेशाची कागदपत्रे आणि प्रशासकीय मंजुरींची पडताळणी महत्त्वाची ठरत आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये शिक्षण विभागातील तत्कालीन अधिकारी तसेच मोठ्या शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे १,२०० संशयितांमध्ये भिती पसरली आहे.
तपासादरम्यान पुरावे नष्ट होऊ नयेत किंवा संबंधित माहिती लपविली जाऊ नये, यासाठी ‘एसआयटी’ने काही बाबी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपासण्यास सुरुवात केल्याचे समजते. दरम्यान, शिक्षण संस्था चालक संजय गरूड याला अटक केल्यानंतर त्याचा भाऊ व संस्थेचा सचिव दीपक गरूड यालाही अटक करण्यात आली आहे. त्याची पोलिस कोठडी आज (दि. ३) रोजी संपत असून त्याच्यासह संस्थेच्या १५ शाळांच्या मुख्याध्यापकांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. संस्थेतील नियुक्त्या, शालार्थ आयडी (Shalarth ID) मंजुरीची प्रक्रिया, आर्थिक व्यवहार तसेच संबंधित कागदपत्रांची कसून छाननी केली जात आहे. संशयितांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून किती रक्कम उकळण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.
असे आहे प्रकरण
संशयित संजय गरूड याने १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी मिळवून दिल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी १४१ जणांच्या मंजुरीचे आदेश २८ ऑगस्ट २०१९ या एकाच दिवशी निर्गमित झाल्याचे तपासात आढळून आले आहे. या आदेशांवर तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची नोंद तपास यंत्रणेकडे आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, शिक्षण संस्था चालक प्रशांत वाडिले तसेच संजय आणि दीपक गरूड यांना अटक झाली आहे.
१,१९९ संशयित; न्यायालयात धाव
या प्रकरणात एकूण १,१९९ संशयित निष्पन्न झाले असून त्यापैकी अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आतापर्यंत १२ जणांनी मुंबई उच्च न्यायालयात गुन्ह्यातील नाव वगळण्याची किंवा फिर्याद रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. संशयित भाऊसाहेब चव्हाण यांचाही त्यात समावेश आहे. तर नितीन बच्छाव यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयातही विविध अर्ज व याचिकांवरील सुनावण्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




