नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सोशल मीडिया (Social Media) नेक्सस प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. नाशिक परिक्षेत्रातून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतलेल्या २१ संशयितांपैकी (Suspected) काही तरुण पाकिस्तानी हस्तकांच्याच नव्हे, तर कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचेही (Lawrence Bishnoi Gang) सोशल मीडिया समर्थक असल्याचे तपासात उघड झाले आहे.
डिटेन केलेले २१ पैकी ५ ते ६ संशयित तरुण सोशल मीडिया हँडल्सवर बिश्नोई गँग आणि तिच्या गुन्हेगारी (Criminal) शैलीला (स्टाईल) ‘फॉलो’ करत होते. प्राथमिक तपासात या तरुणांनी थेट कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे पुरावे अद्याप आढळलेले नाहीत. संशयितांचे डिजिटल पुरावे, मोबाईलमधील डेटा, व्हॉट्सॲप चॅट आणि इतर मेसेंजर ॲप्सची एटीएसकडून सखोल पडताळणी सुरू झाली आहे. हे तरुण आंतरराष्ट्रीय देशविघातक नेक्ससमध्ये पूर्णपणे ओढले जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, नाशिक एटीएसने वेळेत धडक छापे टाकल्यामुळे संभाव्य धोका टळला आहे.
एटीएसच्या (ATS) कसून चौकशीनंतर २१ पैकी १५ संशयितांचा थेट देशविघातक कृत्यांशी संबंध न आढळल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. उर्वरित संशयितांच्या आंतरराष्ट्रीय चॅटिंगची तपासणी सुरू आहे.लताब्यात घेण्यात आलेले सर्वच तरुण हे सुशिक्षित बेरोजगार आहेत. ते कोणतेही सराईत गुन्हेगार नाहीत. केवळ बेरोजगारी आणि नैराश्यापोटी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या अकाऊंट्सशी जोडले गेले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान, हे तरुण या आंतरराष्ट्रीय देशविघातक नेक्ससमध्ये पूर्णपणे ओढले जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, नाशिक ‘एटीएस’ने वेळेत केलेल्या धडक छापेसत्रामुळे संभाव्य अनर्थ टळला असून, दहशतवाद आणि कट्टरतेच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या या तरुणांना जरब बसला आहे.
दुबईतून चालणारे ‘ब्रेनवॉश’ जाळे
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी दुबईत बसून ‘डोगर गँग’च्या मदतीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून भारतीय तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ करत असल्याचे यापूर्वी उघड झाले होते. देशातील काही राज्यांत संशयितांना पेट्रोल बॉम्ब फेकणे किंवा व्हीआयपींच्या रेकीचे ‘टेरर टास्क’ मिळाले होते.
टेरर टास्क नाही
एटीएसने ताब्यात घेतलेल्या २१ संशयितांना शहजाद भट्टी टोळीकडून नाशिक परिक्षेत्रात अद्याप कोणत्याही प्रकारचा ‘टेरर टास्क’ (देशविघातक कृत्य किंवा रेकी) देण्यात आला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. एटीएसच्या सतर्कतेमुळे मोठी सुरक्षा हानी टळली आहे.
मुद्दे
लॉरेन्स बिश्नोई गँगचे केळळ समर्थक
थेट संपर्क वा गुन्ह्यात सहभागाचे पुरावे नाहीत
डिजिटल आणि मोबाईल डेटाची पडताळणी सुरू
नाशिकमध्ये कोणताही ‘टेरर टास्क’ नाही
जाळ्यात अडकलेले सर्व तरुण बेरोजगार
१५ संशयितांची चौकशीनंतर सुटका




