Wednesday, July 22, 2026
HomeनाशिकAshok Kharat Case : १४२ बनावट खात्यांचे 'मनी ट्रेल'; भोंदू खरातविरोधात ईडीने...

Ashok Kharat Case : १४२ बनावट खात्यांचे ‘मनी ट्रेल’; भोंदू खरातविरोधात ईडीने फास आवळला

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कोट्यवधी रुपयांची माया जमवणाऱ्या भोंदू अशोककुमार उर्फ ‘कॅप्टन’ खरातच्या (Ashok Kharat) अंधश्रद्धेच्या बाजाराचे व्यावसायिक रूप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उघड केले आहे. चिंचोके २ लाखांना आणि मधाची बाटली ९ लाखांना विकणाऱ्या या भोंदूने पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क १४२ बनावट बँक खात्यांचे जाळे निर्माण केले होते. कॉर्पोरेट घोटाळ्याला लाजवेल अशा पद्धतीने चालवलेल्या या ‘मनी ट्रेल’ प्रकरणी ईडीने (ED) मुंबईच्या विशेष न्यायालयात तब्बल तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

- Advertisement -

​शनिवारी (दि. १८) दाखल झालेल्या या दोषारोपपत्रात खरातसह त्याची पत्नी कल्पना आणि इतर ४ साथीदारांवर गंभीर ठपका ठेवण्यात आला असून, पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. भक्तांना आपल्याकडे कोणतीतरी अलौकिक शक्ती असल्याचा भास निर्माण करण्यासाठी खरात तंत्रज्ञानाचा गैरवापर करत होता. घरात किंवा आश्रमात भीतीचे वातावरण तयार करण्यासाठी तो रिमोट कंट्रोलने चालणारे बनावट साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करत होता. या भीतीपोटी अनेक असहाय्य महिला भक्तांचे त्याने लैंगिक शोषण केल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले असून, हा केवळ आर्थिक गुन्हा नसून मानवी शोषण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘कॅप्टन’च्या टोळीत कोणाचा समावेश?

​नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात २५ मार्च रोजी नोंद झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यानंतर ईडीने ६ एप्रिल रोजी ‘पीएमएलए’ (पीएमएलए) कायद्यांतर्गत खरातविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या टोळीत खरातसह मुख्य संशयित कल्पना अशोक खरात (पत्नी), अरविंद पांडुरंग बावके, नामकर्ण यशवंत आवारे, अविनाश वामन कांडेकर व मिलिंद दादासाहेब बनकर यांचा समावेश आहे. या खटल्यात ईडीने ३० महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​४२ कोटींची लुटमार

-​ईडीच्या तपासात खरातने भक्तांची तब्बल ४२ कोटी ८८ लाखांची फसवणूक – दोषारोपपत्रातील माहितीनुसार
​-चिंचेच्या बिया : प्रत्येकी २ लाख रुपये
-​बनावट खडे आणि मध : प्रत्येकी ९ लाख रुपयांपर्यंत विक्री
​-गुन्ह्यांचे जाळे : नाशिक, सिन्नर, शिर्डी, राहता येथे एकूण १७ गुन्हे दाखल
​-बेनामी व्यवहारांचे जाळे

जप्त मालमत्ता अशी

मालमत्तेचा प्रकार जप्त रक्कम
रोख रक्कम १३ कोटी ९२ लाख रुपये
परकीय चलन ५ लाख १८ हजार रुपये
बँक ठेवी (एफडी) २ कोटी ६० लाख रुपये
दागिने १ कोटी १२ लाख रुपये
स्थावर मालमत्ता १९ कोटी २० लाख रुपये
आलिशान वाहने मर्सिडीज-बेंझ कार

ताज्या बातम्या

Rahata : भावली ओव्हरफ्लो, दारणात 70 टक्के पाणी

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे आगमन अधूनमधून होत आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली तुडूंब भरले. या धरणाच्या सांडव्यावरुन...