नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एका खुनाच्या गुन्ह्यातून उच्च न्यायालयाकडून (High Court) कलम बदलून सुटका (कमी शिक्षा) होऊन अवघे सात महिने झाले होते, तिथेच पुन्हा एका महिलेचा ३५ वार करून अमानुष खून करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयाने या घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत धरत हा निकाल दिला.
संतोष विष्णू आंबेकर (वय ३६, रा. क्रांती नगर, पंचवटी, नाशिक) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपली सहचारिणी पूजा संदीप आंबेकर हिची ३५ वार करून निर्घृणरणे हत्या केली होती. मृत पूजा हिचा विवाह पूर्वी आरोपीचा भाऊ (Brother) संदीप आंबेकर याच्याशी झाला होता. कौटुंबिक वादांमुळे दोघे वेगळे राहू लागले. दरम्यानच्या काळात आरोपी संतोष आंबेकर हा एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. कारागृहातून सुटल्यानंतर फोनवरून संपर्क वाढून संतोष व पूजा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघेही नाशिकमधील संत कबीर नगर येथे भाड्याच्या खोलीत पती-पत्नीसारखे एकत्र राहू लागले. दरम्यान, ३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पूजा आणि संतोष यांच्यात साडी खरेदीच्या पैशांवरून वाद सुरू झाला.
या वादादरम्यान पूजाने तिची आई चंद्रभागा मेढे यांना फोन करून संतोष मला मारहाण करत असून मारण्याची धमकी देत आहे, असे सांगितले. यानंतर आई धावत घराकडे पोहोचली, तेव्हा संतोष हा पूजावर चाकूने (चॉपर) वार करत होता. आईला पाहताच तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत तेथून पळून गेला. पूजाच्या शरीरावर मान, छाती, पाठीवर आणि पोटावर तब्बल ३५ गंभीर वार करण्यात आले होते. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गंगापूर पोलीस ठाण्याचे (Gangapur Police Station) पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आरोपीच्या कपड्यांवर सापडलेले रक्ताचे डाग आणि घटनेत वापरलेल्या चॉपरवरील रक्त हे मृत पूजाच्याच रक्ताशी तंतोतंत जुळविले. घटनेनंतर आरोपीने राहुल गायकवाड याच्या रिक्षाने नाशिक रोड रेल्वे स्टेशन गाठले होते.
प्रवासादरम्यान त्याने मी पूजाला संपवले अशी कबुली दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने स्वतः दाखवलेल्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळील कचऱ्यातून हत्येसाठी (Murder) वापरलेला चॉपर जप्त करण्यात आला हाेता. दरम्यान, सर्व पुरावे व वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी आरोपी संतोष आंबेकर याला कलम ३०२ आणि कलम ७५ अंतर्गत दोषी ठरवले. आरोपीच्या मानगुटीवर फास आवळून मरेपर्यंत लटकवण्यात यावे असा अंतिम आदेश न्यायालयाने दिला असून, हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या मान्यतेच्या अधीन राहील.
न्यायालयाचे ताशेरे व कलम ७५ चा वापर
या खटल्यात आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि भारतीय दंड संहितेचे कलम ७५ (पूर्वीच्या शिक्षेनंतर पुन्हा गुन्हा केल्यास वाढीव शिक्षा) नुसार शिक्षा देण्यात आली आहे. आरोपी संतोष याला मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२१ रोजी एका गुन्ह्यात कलम ३०४ (भाग १) अंतर्गत दिलासा दिला होता. परंतु, जेलमधून बाहेर आल्यावर अवघ्या सात महिन्यांतच (३ नोव्हेंबर २०२१) त्याने पुन्हा गुन्ह्याची पुनरावृत्ती केली.
न्यायालयाचे निरीक्षण
एका माणसाच्या जीवाचे मोल इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे आहे. पूर्वी १० वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतरही आरोपीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्याच्या मनात मानवी जीवनाबद्दल कोणतीही भीती किंवा आदर उरलेला नाही. असा व्यक्ती समाजाच्या शांततापूर्ण अस्तित्वासाठी थेट धोका आहे, असे म्हणूण न्यायालयाने फाशीचा निर्णय कायम केला.




