Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमNashik Crime News : खून करण्यासाठी मिटिंग प्रकरण; शेखर निकमच्या ताब्याला मंजुरी

Nashik Crime News : खून करण्यासाठी मिटिंग प्रकरण; शेखर निकमच्या ताब्याला मंजुरी

पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत उलगडणार कटाचे गूढ

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

फुलेनगरातील सागर जाधव (Sagar Jadhav) याच्यावर झालेल्या गोळीबार व हत्येचा कट रचल्यामागील सूत्रधार मानला जाणारा अमरावती मध्यवर्ती कारागृहातील (Amravati Central Jail) शिक्षाबंदी शेखर राहुल निकम याच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीला (ताबा) राज्याच्या गृह विभागाने अखेर औपचारिक मंजुरी दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या मंजुरीनंतर या हाय-प्रोफाइल पाॅलिटीक्सच्या तपासाला वेग मिळणार आहे.

- Advertisement -

​या प्रकरणात दोन सराईत टोळ्यांमधील (Gang) जुने वैमनस्य हा एवढाच विषय नसून, कारागृहात असलेल्या कैद्याला बाहेर आणून गुन्ह्याचा कट रचण्यात पाेलीस-गुन्हेगार-राजकारणी या तिढ्याचा पर्दाफाश झाला हाेता. ९ सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती कारागृहातून शेखर निकम याला नाशिक न्यायालयात हजर करण्यासाठी आणले जात असताना, अमरावतीच्या तीन पोलिसांनी त्याला नाशिक पोलिसांच्या लॉकअपमध्ये न ठेवता नाशिकरोड (Nashik Road) येथील एका खासगी लॉजवर ठेवले हाेते.

या लॉजवर गोळीबारातील (Firing) मुख्य संशयित विकी वाघ, विकास वाघ, अमोल पारे ऊर्फ बबल्या आणि भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी कैदी शेखर निकम याची प्रत्यक्ष भेट घेऊन जाधववरील गोळीबाराची पूर्ण रूपरेषा ठरवली. पोलीस तपासात याचे सीसीटीव्ही फीटेज, व्हिडिओ व संभाषणाचे कॉल डिटेल्स जप्त करण्यात आले हाेते. यानंतर, गुन्हेगाराला थेट लॉजवर नेऊन कटात मदत करणाऱ्या अमरावती पोलीस आयुक्तालयातील त्कालिन उपनिरीक्षक मनोहर राठोड, पोलीस अंमलदार मुकेश यादव व सिद्धेश्वर गुट्टे यांना अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी निलंबित केले होते.

वैमनस्यातून हत्येचा कट

​सन २०१७ मध्ये पेठ रोडवर सराईत संतोष उघडे टोळीने किरण निकमची हत्या केली होती. या हत्येतून सागर जाधव हा २०२३ मध्ये निर्दोष सुटला होता. किरण निकमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ शेखर निकम (जो सध्या अमरावती जेलमध्ये आहे) याने उघडे गँगचा समर्थक सागर जाधवचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार १७ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे राहुलवाडीत सागरवर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेवकासह १३ हून अधिक जणांना बेड्या ठोकल्या हाेत्या.

​५ दिवसांत उघडकीस येणार मोठे चेहरे? 

​अपर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) यांच्या अभिप्रायानुसार गृह विभागाने शेखर निकमची शिक्षा तपासापुरती ५ दिवसांसाठी स्थगित केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे निकमचा ताबा घेणार असून, अमरावती मध्यवर्ती कारागृहातून त्याला नाशिकमध्ये आणले जाईल. या ५ दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान निकमला समोरासमोर बसवून सखोल चौकशी केली जाणार आहे. यात लॉजवरील बैठकीत कोणकोणते बडे राजकीय व व्यावसायिक चेहरे पडद्यामागून आर्थिक रसद पुरवत होते, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा उलगडा होणार आहे. ५ दिवसांची मुदत संपल्यानंतर त्याची पुन्हा अमरावती कारागृहात रवानगी केली जाईल.

ताज्या बातम्या

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक होणार

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai वीज निर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही...