नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ग्रामीण भागात महिला बचतगटांचे पैसे गोळा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी आता गुन्हेगारांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ बनू लागले आहेत. हरसूल पोलीस ठाण्याच्या (Harsul Police Station) हद्दीत भरदिवसा एका कर्मचाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणाचा छडा लावत नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) अत्यंत कौशल्याने तिघा अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
मात्र, या घटनेमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ‘एयु’ फायनान्स’ कंपनीचा (AU Finance Company) कर्मचारी नवनाथ मोरे हा ५ जून २०२६ रोजी दुपारी लाडची गावाकडून पारधपाडा येथे मोटारसायकलने जात होता. त्याच्याकडे बचतगटांचे गोळा केलेले ८४,८८० रुपये आणि हिशेबाचा सॅमसंग कंपनीचा टॅब होता. दरम्यान, निर्जन रस्त्यावर पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या स्पोर्टस् बाईकवरील दोन अनोळखी संशयितांनी मोरे यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. डोळ्यांत जळजळ झाल्याने मोरे खाली पडताच संशयितांनी पैशांची बॅग आणि टॅब हिसकावून विळवंडी गावाच्या दिशेने पळ काढला.
पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलिसांनी (Harsul Police) गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. पोलिसांनी सापळा रचून योगेश लहानू फसाळे (२०, रा. लाडची), जयराम महाद् पारधी (२१, रा. पारधीपाडा), सोपान हरी पारधी (२१, रा. पारधीपाडा) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक, सुनील आहेर, हवालदार अनिल गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे अंमलदार भारत खाडे, हेमंत गिलबिले (एलसीबी) यांनी केली.
लाखांची रक्कम आणि स्पोर्टस् बाईक जप्त
पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली महागडी मोटारसायकल (MH १५ KX ७२६५), रोख रक्कम, सॅमसंग टॅबलेट आणि ३ महागडे मोबाईल असा एकूण ३,६३,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महागडी वाहने आणली कुठून?
ग्रामीण भागात ‘रोड रॉबरी’ (रस्त्यावरील लूटमार) चे प्रमाण वाढत असून तरुण मुले महागड्या गाड्यांच्या नादात अशा गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसते. तसेच पोलिसांनी आता नागरिकांना आणि व्यावसायिकांना आपले सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्यांच्या दिशेने लावण्याचे आवाहन केले आहे. या गुन्ह्यात संशयितांनी महागडी वाहने कशी वापरली ? कुठून मिळवली याचा तपास सुरू झाला आहे.




