नाशिक | Nashik
शहरातील बहुचर्चित म्हाडा भूखंड घोटाळ्यात (Nashik MHADA Scam) महसूल प्रशासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत दोषी आढळल्यानंतर एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांना (Talathi) तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले असून, या धडक कारवाईमुळे नाशिकच्या महसूल विभागाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश
निलंबनाच्या आदेशामध्ये पिंपळगाव बसवंत येथील अनिल एकनाथ रोकडे (मंडळ अधिकारी) मनीषा अशोक पाटील (तलाठी मोहाडी) शशिकांत वाल्मिक चितळकर (तलाठी गंगापूर) सागर शेलार (नाशिक शहर) यांच्यासह आदी एका अधिकाऱ्याचा (Officer) समावेश आहे.
म्हसरूळ आणि गंगापूर क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई
म्हाडा भूखंड फेरफार प्रकरणी म्हसरूळ, गंगापूर आणि नाशिक शहर-१ येथील तत्कालीन तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कार्यालयीन दप्तर, सातबारा आणि फेरफार नोंदींची सखोल तपासणी केली होती. या कागदपत्रांच्या चौकशीत अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि निष्काळजीपणा सिद्ध झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कागदोपत्री फेरफार करून म्हाडाचे घरे हडपण्याचा कट
शासकीय नियमांनुसार, एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर बांधकाम करणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये काही ठराविक घरे ‘म्हाडा’ला हस्तांतरित करणे विकासकांसाठी बंधनकारक असते. ही घरे म्हाडाच्या लॉटरीद्वारे सर्वसामान्य आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात दिली जातात. मात्र, या प्रकरणात संबंधित विकासकांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून एक एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असूनही कागदपत्रांत ते १ एकरपेक्षा कमी दाखवले. या बनावट नोंदींमुळे म्हाडाला मिळणाऱ्या हक्काच्या घरांवर डल्ला मारण्यात आला होता.
आणखी बड्या हस्तकांवर कारवाईची टांगती तलवार
या भूखंड घोटाळ्यात यापूर्वीच नाशिकमधील अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांसह (Developers) महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आता प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर वरिष्ठ अधिकारी आणि बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणावर कारवाईचा शॉक बसणार, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.




