नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतून दोन ठिकाणी सोनसाखळी चोरी करणाऱ्या संशयिताला (Suspeted) पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. मीनाक्षी पंकज पिंगळे, (वय-४० वर्षे, व्यवसाय-गृहिणी, रा. फ्लॅट नं. १०, निलांजन अपार्ट, माऊली लॉन्स डीजीपीनगर, नाशिक) ह्या त्यांच्या सासू व मुलीसह (दि. १९ जून) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास माऊली लॉन्स जवळील गणेश स्विट्स समोरून जात असतांना त्यांच्या समोरून मोटारसायकलवर दोन व्यक्ती आले व मागे बसलेल्या व्यक्तीने मीनाक्षी यांच्या मानेवर हात टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे (Gold) मंगळसूत्र ओढले.
त्यावेळी सोन्याचे अर्धे मंगळसूत्र हे त्यांच्या हातात राहिले व अर्धे मंगळसूत्र चोरट्याने जबरीने चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असतांना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार तुषार मते यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संभाजी स्टेडीयम येथे एक व्यक्ती यामाहा कंपनीच्या मोटारसायकल (एम. एच १५ जी.यु. १५२२) गाडीवर येत असून त्याने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंग केली आहे.
मते यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार योगेश देसले, अंमलदार तुषार मते, अनिल गाढवे, राकेश पाटील, सचिन करंजे, मयूर पवार, संजय सपकाळे यांनी संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचून आदित्य एकनाथ सोनवणे, (२५ वर्षे, व्यवसाय खासगी नोकरी, रा. अजिंक्यतारा हॉटेल मागे, सरदवाडी रोड, झापवाडी, ता. सिन्नर) यास ताब्यात घेवून अंबड पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी (Police) त्याच्याकडून २ लाख, ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.





