Saturday, May 9, 2026
Homeक्राईमNashik Crime : खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळताच काढली रॅली; मग पोलिसांनी सनीला...

Nashik Crime : खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळताच काढली रॅली; मग पोलिसांनी सनीला दिवाळीपूर्वीच दिला ‘फराळ’

म्हणाले, 'कसं… तसंच हसून दाखव'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवळाली कॅम्प हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातून (Crime) जामीनावर सुटल्यावर कारमधून ‘विजयी मिरवणूक’ काढून रिल व्हायरल करीत दहशत निर्माण करणाऱ्या सनी कदमची गुन्हे शाखेने (Crime Branch) सोमवारी झाडाझडती घेऊन दिवाळीपूर्वीच पोटभर ‘फराळ’ दिले. ‘रीलमध्ये जसा हसलाय, तसंच हसून दाखव’ म्हणत गुन्हेशाखा पोलीसांनी सनी कदमला खाक्या दाखविला तेव्हा, लालबुंद चेहरा व डोळ्यांतून पाणी वाहतांना तो मोठ्याने ‘साहेब, तसाच हसतो न… नका ना’ म्हणत रडतारडता हसण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

सोमवारी (दि. १३) विसे मळा गोळीबारातील (Firing) संशयित अजय बोरीसाची युनिट एकमध्ये (Unit One) हजेरी सुरू असताना ‘रील्स’वरुन दहशत परसविणाऱ्या सनी कदमला देवळाली कॅम्प पोलिसांनी हुडकून काढत हिरोगिरी काढली. देवळाली कॅम्प हद्दीत संशयित सनी बाजीराव कदम याच्यासह आठ जणांवर दहशत निर्माण केल्याचा गुन्हा आहे. ते ‘रील’ डिलिट करुन पोलिसांनी त्याची ऑक्टोबरच्या सुरुवातीला धिंड काढली होती.

त्यानंतर आता पुन्हा गुन्हे शाखेने त्याला बोलावून घेत ‘सच बोल’ने अद्दल घडवली. ‘फटाक्यां’मुळे आरडाओरड करुन ढसाढसा रडणाऱ्या सनीला ‘त्या रीलप्रमाणे हसून दाखव’ असे म्हणताच त्याला रडतांना हसणं अवघड झालं. रस्त्यावर दहशत करणाऱ्या सनीचा ‘चेहरा’ पाहण्यासारखा होता. यानंतर, पथकाने त्याला बाहेर काढल्यानंतर ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ असे म्हणत हात जोडले व देवळाली कॅम्प पोलिसांच्या व्हॅनमध्ये आसरा घेतला.

‘लेडी डॉन’ ने मागितली माफी

सोशल मीडियावर पोलिसांनी (Police) गस्त देत गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवले आहेत. त्यातून आता महिलांचीही सुटका झालेली नाही. ‘लेडी डॉन’ असल्याचे भासवून ‘हे नाशिक ए भावा. इथ जर तू इज्जत दिली, तर तुला इज्जत भेटणार. नाहीतर तुझी डेडबॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटणार’, असे म्हणत गोदावरी नदी काठावर ‘रील’ बनविणाऱ्या दोघींना देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले. त्यांनी पोलिसांसह नाशिककरांची ‘व्हिडिओ’ द्वारे माफी मागितली आहे. त्याबाबतचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

युनिट एकला, नको रे बाबा…

शहर पोलीसांनी गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी गुन्हेशाखा युनिट एकच्या कार्यालयात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेकांसोबत होणाऱ्या ‘सचबोल’ चर्चेची सर्वच सराईतांसह मातब्बरांनी धास्ती घेतली आहे. गुन्हेगारांसोबत वावरणाऱ्यांना दिवाळी च्या पार्श्वभूमीवर आगाऊ ‘फटाके’ दिल्याने ‘आप्पा, दादा, नानाजी, भाऊ, बाहुबली, भाई, अण्णा,’ शहरातून भूमिगत झाले आहेत. पोलिसांनी ७८ जणांची यादी करून त्यातील रोज दोन-तीन जणांना फराळासह महाप्रसादाचे नियोजन केले आहे. त्यानुसार, आता फराळ वाटपाचे पोलीस ठाणेनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या