वावी | वार्ताहर | Vavi
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) संरक्षण भिंतीचे अँगल चोरी जाण्याचे प्रकार होत होते, याबाबत अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात (Police Station) दाखल आहेत. असाच प्रकार काल सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वावी पोलीस स्टेशन हददीतुन पाथरे ते गोंदे दरम्यान सुमारे ३५ किमी अंतराचा मुंबई-नागपुर (Mumbai to Nagpur) असा समृध्दी महामार्ग गोंदे परिसरात संरक्षण भिंतीस असलेले लोखड़ी गज चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, आदीत्य मिरखेलकर, अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, निलेश पालवे, उपविभागीय पोलीस अधीकारी निफाड उपविभाग यांनी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत सुचना केल्या होत्या.
त्याअनुषंगाने वावी पोलीस ठाण्याचे (Vavi Police Station) सपोनि गणेश शिंदे वावी पोलीस स्टेशन यांनी समृध्दी महामार्गालगतच्या ग्रामस्थांच्या मिटींग घेऊन त्यांना खबरदारीपूर्वक आवश्यक सुचना केल्या होत्या. तसेच वावी पोलीस स्टेशनकडून सदर भागांत रात्री गस्त चालु करण्यात आली होती. दरम्यान बुधवार (दि.२९) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोंदे ता.सिन्नर गावातुन जाणाऱ्या समृध्दी महामार्गावरील लोखंडी अँगल चोरी होत असल्याची माहीती वावी पोलीस तसेच महाराष्ट्र सुरक्षा पथकास मिळाली होती. यानंतर सदर ठिकाणी पेट्रालिंग करत असलेल्या पोलीस पथकाने लागलीच धाव घेत महाराष्ट्र सुरक्षा पथक व गोंदे गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने चोरी करत असणारे आरोपी अमोल रमेश देशमुख (वय २८, रा. बोकटे ता. येवला), गणेश संतोष बोंबले (वय २४, रा. देवळाणे, ता. येवला), तेजस भाऊसाहेब बोंबले (वय २२, रा. देवळाणे, ता. येवला), हेमंत संजय लोंढे (वय २१, रा. रावळगाव ता. मालेगाव) यांना जागेवर पकडले.
दरम्यान, सदर आरोपी (Accused) हे पळ काढण्याच्या प्रयनात होते, मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पकडण्यात यश आले. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या अँगल कापण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसह तसेच चोरी केलेले लोखंड अँगल त्यांनी आणलेल्या पिकअप गाडी (क.एम एच १७ बीवाय ४४४२) मध्ये टाकत असतांना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर सदर घटनेसंदर्भाने फिर्यादी मिलींद दिलीप सरोदे सुरक्षा रक्षक समृध्दी महामार्ग यांच्या फिर्यादीवरुन वावी पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली असून त्यांनी इतर कुठल्या ठिकाणी चोऱ्या केल्या याबाबत तपास सुरु आहे.