Monday, March 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : विधिसंघर्षितांचा राडा; पोलिसांचा आई-वडिलांना सूचक इशारा

Nashik Crime : विधिसंघर्षितांचा राडा; पोलिसांचा आई-वडिलांना सूचक इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिडकोतील शांततेला गालबोट लावून भरवस्तीत उघडपणे शस्त्रांचा धाक दाखवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या एका सराईतासह चार विधिसंघर्षित मुलांच्या मुसक्या अंबड पोलिसांनी (Ambad Police) अवघ्या काही तासांत आवळल्या आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या १३ ते १८ वयोगटातील या मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात पाचारण करून पोलिसांनी त्यांना भविष्यातील कठोर कारवाईचा सूचक इशारा दिला. त्यामुळे आता आपल्या पाल्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी पालकांवर येऊन ठेपली आहे.

- Advertisement -

सिडकोतील (Cidco) गजबजलेल्या महात्मा फुले चौक, सद्भावना चौक आणि गणेश चौक या परिसरात गुरुवारी (दि. १२) रात्री नऊ वाजता हे थरारनाट्य घडले. संशयित गणेश आणि त्याच्या चार अल्पवयीन साथीदारांनी हातात दगड आणि शस्त्रे घेऊन परिसरात आरडाओरडा सुरू केला. ‘कोणी मध्ये आले तर येथेच कापून टाकू’ अशी धमकी देत टोळीने परिसरातील वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. इतकेच नव्हे तर नागरिकांच्या बंद घरांच्या दरवाजांवर दगड मारून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. ६३ वर्षीय बाळासाहेब मल्हारी दोंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे व सीसीटीव्ही फुटे जनुसार संशयितांची ओळख पटवली. या घटनेने सिडकोतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असला तरी अंबड पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पालकांची ‘शाळा’

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने शोधमोहीम राबवून या टोळीला ताब्यात घेतले. कारवाईनंतर पोलिसांनी या मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात (Police Station) बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मुले नेमकी काय करतात, कुठे फिरतात आणि त्यांच्या हातात शस्त्रे कशी येतात ? असा सडेतोड प्रश्न विचारत, मुलांच्या वर्तणुकीवर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात पालकांवरही कायदेशीर कारवाईचा सज्जड दम दिला आहे.

गुन्हेगारीकडे वळणारी पिढी अन् जबाबदारी

सिडकोतील स्लम भागातील या मुलांना कायद्याचा धाक उरलेला नाही. आई-वडील कंपनीत काबाड कष्ट करतात व त्यांची मुले इतरांच्या संगतीने गुन्हेगारीत उतरून राडे घालत आहेत. परिसरातील लोकप्रतिनिधी, पालकांनी पोलिसांच्या मदतीने मुलांचे समुपदेशन, जबाबदार नागरिक या पद्धतीने शिकवण देण्याची गरज आहे. मात्र, १३ ते १८ या वयोगटातील मुलांच्या हातात कागद, पेनऐवजी दगड आणि शस्त्रे येत असतील, तर आता पालकांनीच जागरुक राहून त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

कृषीकुंभ 2026 : शेतीत नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासह प्रयोगशीलता आवश्यक – विभागीय...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik शेती क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि प्रयोगशीलता अत्यंत महत्त्वाची असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन...