नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail) एका कैद्याला जिल्हा न्यायालयात (District Court) सुनावणीसाठी हजर केल्यानंतर सायंकाळी पुन्हा कारागृहात पाठविल्यावर त्याच्या अंगझडतीमध्ये चपलेत सापडलेल्या गांजावरुन नाशिक पोलीसही (Police) संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संबंधित कैद्याविरुद्ध गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद असून, प्रकरणात मुख्यालयाच्या ‘कैदी पार्टी’ चे कर्मचारीही सहभागी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांचे ‘जबाब’ नोंदणीसह खात्यांतर्गत चौकशीबाबत हालचाली सुरू झाल्याचे समजते. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Jail) कर्मचारी नारायण राजपूत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार न्यायालयीन कैदी संशयित नवनाथ साहेबराव गोरड याच्या चपलेत १ हजार रुपयांचा ४३ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतल्यावर हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, गोरड याला गुरुवारी (दि. १६) न्यायालयीन कामासाठी कारागृहातून जिल्हा न्यायालयात नेण्यात आले. तेव्हा पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालय येथून नेमलेल्या ‘कैदी पार्टी’च्या ताब्यात संशयित होता. न्यायालयीन कामकाजानंतर त्याला दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास पुन्हा कारागृहात पाठवले. त्यावेळी हा प्रकार उघड झाल्याने आता ‘कैदी पार्टी’ च्या कर्मचाऱ्यांना चपलेत गांजा असल्याबाबत समजले नाही का,चपलेत गांजा (Ganja) कोठून आला, कारागृहात गांजा होता की, न्यायालयीन आवारात त्याला कोणी गांजा दिला याबाबत तपास सुरु आहे.
‘वजन’ बंद होणार?
पोलीस मुख्यालयातून ठराविक अंमलदारांना ‘कैदी पार्टी’ साठी नेमण्यात येते. संबंधित कर्तव्यावर नेमण्यासाठी तेथील हजेरीमास्तरांना या अंमलदारांमार्फत ‘विशेष’ बक्षीस मिळत असल्याची चर्चा आहे. न्यायालयातून निघतांना संशयितांना नातलगांसोबत भेटू देणे, घरचा डब्बा व इतर वस्तू देणे, न्यायालयीन प्रक्रिया लवकर संपूनही सायंकाळी कारागृहात कैद्यांना हजर करणे, बाहेर हॉटेलात जेवण करु देणे यासाठी कैद्यांसह त्यांच्या नातलगांमार्फत हे विशिष्ट बक्षीस दिले जाते, असे कळते. हेच ‘वजन’ संबंधित कर्तव्यावर नेमणूक करुन घेण्यासाठी हजेरीमास्तरसह संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते, अशी चर्चा आहे.





