नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘ऑरा’ बारमधील गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले सातपूर येथील ‘पीएल’ ग्रुपचे संस्थापक व रिपाइंचे माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे (Prakash Londhe) याच्या ‘धम्मतीर्थ’ संपर्क कार्यालयात सातपूर पोलिसांनी (Satpur Police) शनिवारी (दि.११) तपासादरम्यान छापा टाकल्यानंतर तेथे परत भुयार सापडले. या भुयारातील कुऱ्हाड, कांबी आणि अन्य हत्यारांचा साठा जप्त करून ‘बेडरूम्स’मधून काही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
‘बॉस’च्या याच भुयारात काही वर्षांपूर्वी दुहेरी हत्या (Murder) झाल्याचा आरोप होता. त्यातून लोंढेंचा पुत्र भूषण व इतर न्यायालयाच्या आदेशाने निर्दोषमुक्त बाहेर आहेत. सातपूर पोलिसांच्या हद्दीतील ऑरा बारबाहेर राड्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणात (Firing Case) पसार असलेला संशयित भूषण प्रकाश लोंढे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्याचे वडील प्रकाश लोंढे व बंधू दीपक लोंढेसह इतर साथीदारांविरुद्ध गोळीबार, अपहरण, खंडणीसह फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत.
दहशत निर्माण केल्याप्रकरणीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा (Case) नोंद आहेत. तर गोळीबारप्रकरणात संशयित प्रकाश लोंढे, दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे, संतोष पवार उर्फ जल्लाद, अमोल पगारे, शुभम पाटील उर्फ भुऱ्या, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे, देवेश शेरताटे व शुभम गोसावी हे पोलीस कोठडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’, असे म्हणताना लोंढेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांची पोलिस कोठडी (Police Custody) आज रविवारी (दि. १२) संपणार आहे.
दरम्यान, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या पथकाने लोंढेचे संपर्क कार्यालय पिंजून भूयार उघड केले. उज्जैन येथून बेकायदेशिरपणे खरेदी केलेले व गोळीबारात वापरलेले पिस्तुल भुयारातील घरातून जप्त करण्यात आले असून भूयारात चाकू, सुरे, कोयत्यांसह इतर हत्यारांचा मोठा साठा हस्तगत केल्याचे समजते. भिंतींना असलेले फर्निचर किंचिंत हलविल्यानंतर दोन बेडरूम समोर आल्याचे तपासात उघड झाले असून या प्रकरणातील इतरांचा शोध सुरु आहे.




