नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तब्बल ४०० कोटी रुपयांनी भरलेल्या कथित कंटेनर लुटीचा गाजावाजा करत राज्यभर चर्चेत आलेले प्रकरण अखेर इगतपुरी न्यायालयात (Igatpuri Court) ‘फुसके बार’ ठरले आहे. ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या सात संशयितांना न्यायालयाने (Court) जामीन मंजूर केला. त्यामुळे फिर्यादी संदीप पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांकडे (Nashik Rural Police) संदीप पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबईहून नाशिकमार्गे दक्षिण भारतात जाणारा ४०० कोटी रुपयांच्या (कथित) जुन्या नोटांनी भरलेला कंटेनर लुटण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित प्रकरणात संशयित विराट सतीश गांधी, जयेश कोडींराम कदम, सुनील गंगाराम धुमाळ, जर्नादन भीमराव धायगुडे, विशाल सुब्रमण्यम नायडू यांच्यासह अन्य संशयितांनी अपहरण करून मारहाण केल्याचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा आरोप केला होता.
घटनेनंतर पाटील यांनी व्हिडिओ संदेश सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करून खळबळ उडवली होती. प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन केली होती. कर्नाटक पोलिसही तपासात सहभागी झाले होते. काही संशयितांना अटक करण्यात आली; तर विराट गांधी याला जयपूर येथून ताब्यात घेऊन इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यास पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान कथित ४०० कोटी रुपयांच्या अस्तित्वाबाबत ठोस पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणांना यश आले नाही.
दरम्यान, कंटेनर, रोकड वा व्यवहारासंबंधी कोणतेही दस्तऐवजीकरण, आर्थिक पुरावे अथवा स्वतंत्र साक्षी न्यायालयात ठोसपणे मांडता आले नसल्याचे स्पष्ट झाले. याच मुद्द्यावर बचाव पक्षाचे अॅड. अविनाश भिडे, अॅड. मृणाल भिडे व अॅड. प्रसाद नागवंशी यांनी इगतपुरी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवत, “संशयितांविरोधात ठोस पुरावे आढळत नाहीत,” असे नमूद करत सर्व सातही जणांना जामीन मंजूर केला. त्यामुळे गाजलेल्या ४०० कोटींच्या कथित लुटीमागील वास्तव काय, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे. या निर्णयामुळे संदीप पाटील यांच्या तक्रारीतील तथ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.




