Friday, July 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदाढेगाव पुलावर दुर्दैवी घटना; दुचाकीसह चालक पुराच्या पाण्यात गेला वाहून

दाढेगाव पुलावर दुर्दैवी घटना; दुचाकीसह चालक पुराच्या पाण्यात गेला वाहून

इंदिरानगर | वार्ताहर Indira Nagar

- Advertisement -

पाथर्डी–दाढेगाव मार्गावरील वालदेवी नदीच्या पुलावर आज सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पाथर्डीकडून दाढेगावकडे जाणारी एक व्यक्ती गाडीसह पुराच्या पाण्यात वाहून गेली. रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यक्ती कोण होती त्याची ओळख पटू शकली नाही. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने अग्निशामक दलाने रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत शोधकार्य करून ते स्थगित केले. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या घटनेनंतर दाढेगाव परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच हा पूल खचला होता. यापूर्वीही याच पुलावरून काही जण पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या असून, तरीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी आमदार निधीतून हा पूल उभारण्यात आला होता. मात्र पूल उंच व मजबूत करण्याऐवजी पाईप टाकून बांधकाम करण्यात आल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूल धोकादायक ठरतो. याबाबत ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच सूचना व आक्षेप नोंदविले होते. तसेच पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक, महानगरपालिका कर्मचारी किंवा पोलीस तैनात करण्याची मागणीही वारंवार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

घटनेनंतर सोमनाथ बोराळे, अंकुश भोर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी स्वतः शोधकार्य केले. मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने त्यांना यश आले नाही.
वारंवार जीवघेण्या ठरत असलेल्या दाढेगाव पुलावर तातडीने कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी, पुलाचे पुनर्बांधकाम करून तो उंच करावा आणि पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या बातम्या

गोदावरी नदीला पूर; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे....