नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एक हजारहून अधिक बनावट ‘शालार्थ आयडी (Shalarth ID Scam) बनवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याच्या आरोपात जेलवारी करणारा नाशिकचा (Nashik) माजी शिक्षक उपसंचालक संशयित नितीन उपासनी (Nitin Upasani) याचा ताबा नाशिक ग्रामिणच्या आर्थिक गुन्हेशाखेची ‘एसआयटी’ घेणार आहे. सोमवारी (दि. १५) यासंदर्भाने पोलीस न्यायालयीन कार्यवाही करणार आहेत.
शालार्थ घोटाळ्याप्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेने शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी याला काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. सध्या तो नाशिकरोड कारागृहात (Nashik Road Jail) असून त्याचा जामिन अर्ज नुकताच जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीसांच्या ईओडब्लूतील (एसआयटी) विशेष तपास पथकाचे प्रमुख व पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांनी आवश्यक कायदेशिर कार्यवाही सुरु केली आहे. शिक्षक आणि लिपिकपदी बोगस भरती केल्याप्रकरणी मालेगावातील दोन स्वतंत्र पोलीस ठाण्यांत शिक्षण संस्थाचालकांसह मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल गुन्ह्यांतही संशयाची सुई नितीन उपासनी याच्याभोवती फिरल्याने खळबळ उडाली आहे.
तीन कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई करुन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील, कार्यालय अधीक्षक सुधीर भास्कर पगार आणि उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठल देवरे या संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. याच प्रकरणांमध्ये संशयित उपासनीभोवती पोलिसांनी चौकशी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) उपासनीच्या चौकशीचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने सुटका करून घेतली होती. नितीन उपासनी व भाऊसाहेब चव्हाणचा सहभाग उघड होत असल्याने दोघांना लवकरच अटक (Arrested) होणार आहे.
मंगळवारी भाऊसाहेबचा निर्णय
शालार्थ घोटाळ्याची नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद देणारा तत्कालिन शिक्षक उपसंचालक संशयित भाऊसाहेब चव्हाण यालाही शहर पोलीसांनी तपासाअंती संशयित केले आहे. त्याने अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर उच्च न्यायालयाने त्याला १६ डिसेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व मंजूर केला. त्यामुळे मंगळवारी (दि. १६) होणाऱ्या सुनावणीनंतर त्याला अटक होते की दिलासा मिळतो याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
राऊडी अडकणार?
बोगस शिक्षक भरती केल्यासंदर्भाने मालेगावात उपासनीसह चव्हाणवर गुन्हा नोंद आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने शालार्थ व बोगस भरतीसंदर्भाने दाखल सर्वच गुन्ह्यांच्या तपासासाठी ग्रामीण आर्थिक गुन्हेशाखेत ‘एसआयटी स्थापन आहे. दोन्ही संशयितांच्या अटकेनंतर आता समायोजन आणि शालार्थमध्ये उपासनीसह चव्हाणची खास मर्जी राखणारा कार्यालयातील ‘राऊडी लिपिक रडारवर येणार असल्याचे समजते.




