नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर पोलिसांच्या (City Police) नाकावर टिच्चून सोमवारी रात्री शरणपूर रोडवरील बेथेलनगरात एका सराईत गुन्हेगाराला (Criminal) मारण्याच्या हेतूने टोळीयुद्धाचा भडका उडाला. हर्षद पाटणकर ऊर्फ जस्टीन याला यमसदनी धाडण्याच्या हेतूने आलेल्या टोळक्याने हवेत गोळीबार करून वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने सहा संशयितांना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार पसार आहे.
मागील दोन आठवड्यात पोलिसांच्या (Police) कारवाईचा ससेमिरा काहीसा घटला असतानाच, नेहमीच कुरबुरीच्या टोकावर राहिलेल्या बेथेलनगरात टोळक्याने एका सराईत गुन्हेगाराची सुपारी घेतल्याचे मंगळवारी सकाळी निष्पन्न झाले. पूर्ववैमनस्यातून एका टोळीने गुन्हेगार हर्षद पाटणकर याला मारण्याच्या उद्देशाने बेथेलनगरात जात उच्छाद मांडला. पाटणकर हा काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यांत पसार असून, तो बेथेलनगरात आल्याची माहिती टोळक्याला मिळाली असता त्यांनी हवेत गोळीबार केला. परंतु पाटणकर तेथे नसल्याने वाहने फोडून ते पसार झाले.
बेथेलनगरात राहणारे रिक्षाचालक मायकल भंडारी (५१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण पवार, रोशन शिंदे, ओम जगताप, प्रेम जगताप, अजय देवरे, विक्की गुंजाळ या संशयितांविरुद्ध गुन्हा (Case) नोंद झाला आहे. सोमवारी (दि. ३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बेथेल नगरात संशयितांचे टोळके एकत्रित झाले. त्यांनी कोयते, चॉपर, दांडक्यांनी गल्लीतील दोन रिक्षांसह काही दुचाकींची तोडफोड केली. काही नागरिकांच्या घरांवर काचेच्या बाटल्या फेकून शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यासह फिर्यादी भंडारी यांना तुझा गेम बाजवतो, असे धमकावून कोयता उगारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सदर माहिती कळताच पोलीस दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असता गोळीबारातील एक संशयित गंगापूररोडवरून जेहान सर्कलच्या दिशेने पळून जात असताना गंगापूर पोलिसांनी नाकाबंदीवेळी संशय आल्याने त्याला अडवले. तोपर्यंत नियंत्रण कक्षातून संबंधित घटनेची माहिती सर्व पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. या घटनेने शरणपूररोड, बेथेलनगर, कॅनडा कॉर्नर व तिबेटीयन मार्केट परिसरात भीती पसरली आहे.
कोण आहे पाटणकर?
सराईत गुंड हर्षद सुनील पाटणकर (२८, रा. बेथेलनगर, शरणपूर रोड) याला तडीपार केल्यानंतर जुलै २०२३ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्ध केले होते. २४ जुलै २०२४ रोजी स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण झाल्याने पाटणकरची सुटका झाली. त्यावेळी पाटणकरला कारमध्ये बसवून संशयित नरेश ऊर्फ पवन माणिक कसबे (३१, रा. ध्रुवन गर) याच्यासह इतर संशयितांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्याप्रकरणी पाटणकर व कसबे यांना अटक झाली होती. सायंकाळी निघालेली ही मिरवणूक परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरुन मार्गस्थ झाली होती. कर्णकर्कश हॉर्न वाजवून दुचाकी जात असल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत संशयितांचा माग काढला होता. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओनुसार संशयित पाटणकर, कसबे यांच्यासह गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तीसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे (सर्व रा. बेथेलनगर) यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.




