नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने तणावात असलेल्या विद्यार्थ्याने (Student) घरातून बेपत्ता होत पंचवटीतील (Panchvati) होळकर पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. श्रीधर संतोषकुमार शहा (वय १७ वर्षे ०६ महिने, रा. खुशाली विहार, गुलमोहरनगर, म्हसरूळ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. म्हसरूळ पोलिसांत अपहरणाची नोंद झाल्यानंतर काही तासांतच त्याचा मृतदेह गोदापात्रात आढळून आला. पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
१८ फेब्रुवारी रोजी त्याने बारावी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, रसायनशास्त्र विषयाचा (Chemistry Subject) पेपर दिला होता. मात्र तो अवघड गेल्यासह केवळ पन्नासच मार्काचा सोडवल्याचे त्याने वडिलांना सांगितले. वडिलांनी त्याला दिलासा देत ‘काळजी करू नको, पुढे पाहू’ असे म्हणत जोमाने अभ्यास कर असा सल्ला दिला. मात्र, त्याच रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने घर सोडले. पेपरचा ताण त्याच्यावर असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. घरातून निघून गेल्यानंतर तो परत न आल्याने वडिलांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली. दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंचवटीतील होळकर पुलाखालील गोदापात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हे देखील वाचा : Nashik Crime : प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रेयसीला संपवलं; अखेर ‘त्या’ तरुणीच्या हत्येचा उलगडा
यानंतर घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात पुलावरून उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. ओळख पटविण्याच्या प्रक्रियेदरम्यान, म्हसरुळ येथून बेपत्ता झालेला श्रीधर याचाच हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दोन्ही पोलीस ठाण्यांतील नोंदींची पडताळणी करून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे गुलमोहरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, परीक्षेच्या ताणामुळे घडलेल्या या घटनेने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी तणाव न घेता आई वडिलांशी व मित्रांशी संवाद साधावा, टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





