नाशिक | Nashik
गेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे नाशिक शहरासह (Nashik City) संपूर्ण जिल्ह्याची बुधवारी (दि०८) रोजी दाणादाण उडाली. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले आणि गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला. शहरात सिंहस्थ कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले तसेच ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. महापालिका, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पूरपरिस्थितीवर मिळवण्यासाठी नियंत्रण रात्रं-दिवस प्रयत्न केले.
मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water Position) देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. तर नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. सध्या गंगापूर धरण ७०.१८ टक्के इतके भरले असून, मागील वर्षी गंगापूर धरण आजच्या दिवशी ५५.२२ टक्के इतके भरले होते. तर धरण समूहातील मागील वर्षीची टक्केवारी ६८.३८ टक्के इतकी होती. यानंतर आज धरण समूहातील पाण्याची टक्केवारी ६४.७७ एवढी आहे.
दरम्यान, पावसाळा सुरु होण्याआधी काही तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा (Water Supply) सुरु होता. तसेच महिलांना दोन किलोमीटरवरून डोक्यावर पाण्याचा हंडा आणावा लागत होता. मात्र, आता पाऊस पडल्यामुळे सध्या तरी काही प्रमाणावर पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
जिल्ह्यात मोसमातील एकूण ३५६.४ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद
एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. इगतपुरीत अवघ्या दोन दिवसांत तब्बल ४०५ मिमी पावसाची नोंद झाली, तर बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत २०५ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. नाशिक शहरातही २० तासांत १४२ मिमी पाऊस पडल्याने मोसमातील एकूण पाऊस ३५६.४ मिमीवर पोहोचला आहे.
नुकसानाची भरपाई द्या; जबाबदारीही निश्चित करा
केवळ दोन दिवसांच्या पावसानेच नाशिकमधील सिंहस्थ कामांचा नागरिकांना प्रचंड फटका बसला व त्यांचे अफाट हाल झाले. आधीच जर्जर झालेल्या रस्त्यांची प्रकृती आणखीच तोळामासा झाली. ठिकठिकाणी रस्ते खचले आणि लोकांच्या वाहनांसह सिटी लिंकची बसही खड्ड्यात फसली. अनेकजण जखमी झाले. यामुळे आता घराबाहेर पडलेली व्यक्ती सहीसलामत परतेल की नाही, अशी भीती वाटू लागली आहे. त्यातच, शहरात सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी ते कोणत्या स्वरूपाचे आहे, किती दिवस चालणार आहे, तेथून वाहतूक कशी वळवली आहे ही माहिती देणारे फलक नसल्याने नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. लोकांना झालेल्या शारीरिक इजा आणि वाहनांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी महापालिकेने जनतेचा विमा काढला पाहिजे. शिवाय, या सर्व प्रकाराला जबाबदार कोण हेदेखील निश्चित करायला हवे. तसे होणार नसेल तर लोकांनी प्रशासनाविरोधात थेट खटलेच दाखल करायला पाहिजे.
संपादक
अपघात आणि बचावकार्य
कार्बन नाका परिसरात रस्ता खचल्याने एक ट्रक अडकला. दरम्यान, नांदूर मध्यमेश्वर जवळील बेटावर अडकलेल्या ५ जणांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. दुर्दैवाने, गेल्या दोन दिवसांत पावसामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जनजीवन विस्कळीत
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली. नासर्डी आणि दादोबा रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाला रस्ते बंद करावे लागले. तसेच शहरात अनेक ठिकाणी सिंहस्थाची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.
पर्यटनावर बंदी
सोमेश्वर धबधबा वाहू लागल्याने गर्दी वाढली आहे. १३ जुलैपर्यंत धबधबे आणि ट्रेकिंग पॉइंट्सवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ६ तालुक्यांमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आजचा धरणसाठा
गंगापूर – ७०.१८ टक्के
दारणा -५२.०८ टक्के
कडवा -७८.२६ टक्के
भावली -८७.५२ टक्के
हरणबारी – ७१.४४ टक्के
चणकापूर- ४९.५७ टक्के
तालुकानिहाय पाऊस (मिमी)
मालेगाव – ५६.८
बागलाण – १२२.१
कळवण – १७८.५
नांदगाव – ५९.६
सुरगाणा – १५४.२
नाशिक – ११८.८
दिंडोरी – ९१.६
इगतपुरी – ११७.४
पेठ – ११४.९
निफाड – ७५.१
सिन्नर – ८८.६
येवला – ४२.१
चांदवड – ७८.३
त्र्यंबकेश्वर – २९५.६
देवळा – ६९.५




