Friday, October 16, 2026
HomeनाशिकNashik Dindori News : जांबुटके एमआयडीसीचा 'श्रीगणेशा'; ५९ कोटींच्या पायाभूत सुविधांना गती,...

Nashik Dindori News : जांबुटके एमआयडीसीचा ‘श्रीगणेशा’; ५९ कोटींच्या पायाभूत सुविधांना गती, २९ हेक्टरवर औद्योगिक क्षेत्र

५८ ‘प्लग-अँड-प्ले’ शेड, वाघाड धरणातून पाणीपुरवठा

ओझे l विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) जांबुटके येथे प्रस्तावित आदिवासी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तब्बल ५९ कोटी ७३ लाख ८६ हजार रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जांबुटके औद्योगिक क्षेत्राच्या (Jambutke MIDC) प्रत्यक्ष विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ८४८ लगत सुमारे २९.५२ हेक्टर क्षेत्रावर हे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. येथे उद्योगांसाठी भूखंडांसोबतच पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाइट, तयार औद्योगिक शेड तसेच सामुदायिक सुविधांची उभारणी केली जाणार आहे. या सुविधांमुळे दिंडोरी तालुक्यातील औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

२०२२ मध्ये झाली होती घोषणा

जांबुटके येथे राज्यातील पहिले आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात केली होती. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून या प्रकल्पाला आकार देण्यात आला. त्यावेळी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर काही काळ प्रकल्पाची कार्यवाही संथ झाली. अखेर १७ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळाने जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर २ एप्रिल २०२६ रोजी महसूल व वन विभागाने २९.५२ हेक्टर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली. आता पायाभूत सुविधांसाठी टेंडर प्रसिद्ध झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

वाघाड धरणातून १० किलोमीटर जलवाहिनी

औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी वाघाड धरणातून सुमारे १० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. धरणातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल व अत्याधुनिक पंपिंग यंत्रणा उभारली जाणार आहे. तसेच दररोज १.५० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.याशिवाय ३०० घनमीटर क्षमतेचा उंच जलकुंभ आणि १ हजार घनमीटर क्षमतेचा आरसीसी जलसाठा उभारला जाणार आहे. जॅकवेलपर्यंत पोहोचण्यासाठी ३.७५ मीटर रुंदीचा अ‍ॅप्रोच रोड तसेच ५ मीटर रुंदीचा आरसीसी पूलही बांधण्यात येणार आहे.

५८ ‘प्लग-अँड-प्ले’ शेड

जांबुटके औद्योगिक क्षेत्राचे विशेष आकर्षण म्हणजे उद्योजकांसाठी प्रस्तावित ५८ ‘प्लग-अँड-प्ले’ शेड. प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग (PEB) तंत्रज्ञानाचा वापर करून या शेडची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक शेडला अंतर्गत रस्ता, प्रारंभिक डांबरीकरण, कंपाउंड वॉल आणि प्रवेशद्वाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांना स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्याची आवश्यकता कमी होऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार जागा उपलब्ध होणार आहे.

कन्व्हेन्शन सेंटर, स्वतंत्र प्रवेशद्वार

औद्योगिक क्षेत्रात सुमारे २ हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्राचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. बैठका, प्रशिक्षण, सामूहिक कार्यक्रम तसेच विविध व्यावसायिक उपक्रमांसाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे. ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

रोजगारनिर्मितीला मिळणार चालना

जमीन, पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, प्रकाशव्यवस्था आणि तयार शेड अशा मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास जांबुटके औद्योगिक क्षेत्र उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः आदिवासी भागातील युवकांना उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.५९.७३ कोटींच्या पायाभूत सुविधांच्या टेंडरमुळे जांबुटके औद्योगिक क्षेत्राच्या प्रत्यक्ष उभारणीचा ‘श्रीगणेशा’ झाला असून, आता कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होते याकडे दिंडोरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जांबुटके येथील आदिवासी औद्योगिक क्लस्टर हा केवळ औद्योगिक प्रकल्प नसून दिंडोरीच्या आदिवासी बांधवांना रोजगार, उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या संधी देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. पायाभूत सुविधांच्या कामाला सुरुवात होत असल्याने या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष आकार मिळत असून, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

नरहरी झिरवाळ, मंत्री

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये ‘अन्नपूर्ती’ धान्य एटीएम; उद्या मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार...

0
नाशिक, दि. 16 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : स्वस्त धान्य दुकानांवरील रांगा, वेळेची अडचण आणि वितरणातील पारदर्शकतेचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलले...