दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
विद्युत तारांच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथील एका तरुणाचा (Youth) विजेच्या धक्क्याने मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये विद्युत ताराबद्दल भीतीचे वातावरण पसरले असून वीज कंपनीने तातडीने विद्युत तारांच्या भोवती प्लास्टिक आवरण बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दिंडोरी गांधीनगर येथे विद्युत तारांचे प्रचंड जाळे आहे. परवापासून वातावरणात बदल झाला असून हवा वाहत आहे. थोड्याफार प्रमाणात वादळ पण निर्माण होत असून आज (सोमवार) सकाळपासून वारा वाहत असल्याने तारा सुद्धा हलत होत्या.
दिंडोरीतील टॉवर गल्ली येथे हरी पुंजा गायकवाड (वय ४५) हे घराच्या टाकीवर साफसफाई करण्यासाठी तेथे काम करीत होते. त्या टाक्यांवरून व घरावरून (House) १३२ केवीचा विद्युत तारांचा प्रवाह गेलेला आहे. हवा असल्याने तारा झुलत होत्या, याच तारांच्या प्रभावात आल्याने हरिभाऊ घराच्या छतावरून खाली पडले मृत्यू पावले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विद्युत प्रवाह व तरंगांचा प्रभाव इतका भयानक होता की ते भिंतीवर आदळले.
दरम्यान, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) गायकवाड यांना तपासणीसाठी आणले असता डॉ. काळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिस हवालदार प्रवीण शिंदे यांनी पंचनामा केला. तर वीज कंपनीचे शाखा अभियंता नागरे व महेंद्र पैठने यांनी प्रत्यक्ष येऊन तारांची पाहणी केली व मयत हरिभाऊ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. गांधीनगर येथील सर्व विद्युत तारांचे जाळे हे भूमिगत करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक नितीन गांगुर्डे ,अरुण गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे.





