अकोले | Akole
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल शनिवारी सायंकाळी धरणातून 8 हजार 500 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आणि प्रवरा नदीचे पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाले.
भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पावसामुळे तीन दिवसांपूर्वी भंडारदरा धरण भरले. भंडारदरा धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. भंडारदरा मधून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होते. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असताना निळवंडे धरणाचे पाणलोट क्षेत्र असणार्या भंडारदरा ते निळवंडे पर्यंतच्या परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कळसूबाई शिखर परिसरातील जोरदार पावसामुळे कृष्णवंती नदीला पूर आला होता. हे सर्व पाणी निळवंडे धरणातच येत असते.यामुळे मागील तीन दिवसातच निळवंडेच्या पाणी साठ्यात 4 हजार दशलक्ष घनफूट पाण्याची भर पडली.
काल सकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा 90.32टक्के झाला होता. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे तसेच कृष्णवंती नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे दिवसभरातही निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू होती. अखेर सायंकाळी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या भिंतीवरील सांडव्याची दारे (गेट ) वर उचलण्यात आली आणि धरणातील पाणी वेगाने प्रवरा नदी पात्रात झेपावले. सायंकाळी निळवंडे धरणाच्या सांडव्यातून 7800 क्युसेक व वीज निर्मितीसाठी 700 क्युसेक असा 8500 क्युसेक विसर्ग सुरु होता. त्यावेळी 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणात 7745 दलघफू म्हणजेच 92.93 टक्के पाणीसाठा झाला होता.
निळवंडे धरणातून पाणी सोडल्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात नागरिकांनी जाणे टाळावे,जनावरे व वाहने नदीकाठी नेऊ नये, लहान मुलांना नदीकाठी जाऊ देऊ नये, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.पावसाच्या प्रमाणानुसार धरणात येणार्या पाण्याचे प्रमाण कमी जास्ती होत असते.त्याप्रमाणे धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी जास्ती करण्यात येत असते. पावसाचे प्रमाण वाढल्यास निळवंडे धरणाचा विसर्ग वाढू शकेल.
प्रवरा नदी वाहती झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालेला आहे. प्रवरा नदीला येऊन मिळणार्या म्हाळुंगी आणि आढळा या नदयांचे पाणी अद्यापही टिकून आहे. हे सर्व पाणी जायकवाडी धरणात जाते. त्यामुळे जायकवाडीच्या पाणी साठ्यात ही वाढ होण्यास मदत होणार आहे. जायकवाडीचा पाणीसाठा किमान 65 टक्के होणे जिल्ह्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. 65 टक्के पाणी साठा झाला नाही तर समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्या प्रमाणे मुळा, भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागते. त्यामुळे आत्ता जिल्ह्याचे लक्ष जायकवाडीकडे लागले आहे.
डिंभे धरणातून विसर्ग सुरू; कुकडी प्रकल्पात 70 टक्के पाणी
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने हेही धरण ओव्हरफ्लो झाले आहे. 13500 दलघफू क्षमता असलेल्या या धरणात 12418 दलघफू (91.39 टक्के) पाणीसाठा कायम ठेऊन धरणाची सुरक्षितता आणि पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी घोड नदीपात्रात वक्र दरवाजांद्वारे शुक्रवारी रात्री 10 वाजेपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, पावसाची तीव्रता वाढल्यास नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री डिंभे सांडव्यातून विसर्ग 2500 क्युसेकने सुरू करण्यात आला. पाऊस सुरू असल्याने आणि पाण्याची आवक वाढत असल्याने काल शनिवारी दुपारी 1 वाजता हा विसर्ग 7350 क्युसकेपर्यंत वाढविण्यात आला.
डिंभे, गोहे, कानसे, महाळुंगे तर्फे घोडा, शिनोली, घोडेगाव तसेच घोड नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काल सायंकाळी 4 वाजता कुुकडी समुहातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 20604 दलघफू (70 टक्के) झाला होता. गतवर्षी हा साठा केवळ 58 टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणी असल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.




