Saturday, August 22, 2026
HomeनगरRahata : पाणी सोडण्याचे नगर-नाशिकचे संकट टळणार

Rahata : पाणी सोडण्याचे नगर-नाशिकचे संकट टळणार

जायकवाडीचा उपयुक्त साठा 52.74 टक्क्यांवर, आवक सुरूच

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या पुरामुळे जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा काल सायंकाळी 52.74 टक्के इतका झाला. काल याच वेळी या जलाशयात 91841 क्युसेकने पाण्याचा विसर्ग दाखल होत होता. समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार 9 टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याने हे अपेक्षित पाणी उपलब्ध होणार असल्याने अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून भविष्यात जायकवाडीला पाणी सोडण्याचे दोन्ही जिल्ह्यांचे संकट टळणार आहे.

- Advertisement -

गेल्या आठवडाभरात नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला. तसेच नांदूर मधमेश्वर बंधार्‍याच्या मुक्त पाणलोटातील जोरदार पाऊस झाल्याने धरणातील विसर्ग व मुक्त पाणलोटातील पाणी यामुळे गोदावरीला पूर आला. या पुरामुळे जायकवाडीकडे गोदावरीतून काल सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण सुमारे 22 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. कालही 46227 क्युसेकने विसर्ग जायकवाडीकडे झेपावत होता. जायकवाडीत सायंकाळी 6 वाजता 91841 क्युसेकने विसर्ग दाखल होत होता. काल सायंकाळी जायकवाडीत 52.74 टक्के उपयुक्त साठा झाला होता. म्हणजेच 40.4 टीएमसी उपयुक्त साठा झाला होता. मृतसह एकूण साठा 66.5 टीएमसी इतका झाला आहे. उपयुक्त साठा 50 टीएमसी होणे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार अपेक्षित आहे. त्यामुळे 9 टीएमसी पाण्याची आवक होणे अपेक्षित आहे.

जायकवाडी जलाशयात पाण्याची आवक पाहता दोन दिवसात ही गरज भागू शकते. गोदावरीतून विसर्ग सुरूच आहे. आता प्रवरेचे पाणीही दाखल होऊ लागले आहे. भंडारदरा 13040 क्युसेकने सुरू आहे. हे पाणी निळवंडेत आल्यानंतर निळवंडेतून 8500 क्युसेकने विसर्ग प्रवरेत सोडला जात आहे. नेवासा तालुक्यातील मधमेश्वर बंधार्‍यात सायंकाळी 6 वाजता 5002 क्युसेकने विसर्ग नोंदला गेला. हे पाणी जायकवाडी जलाशयात दाखल होत आहे. गोदावरीत काल सायंकाळी 46227 क्युसेकने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सुमारे 5.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात काल धरणांच्या पाणलोटात मध्यम पावसाने हजेरी लावली. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणा तसेच गंगापूर धरण समूहाच्या पाणलोटात दोन अंकी पाऊस झाला. काल दिवसभरातील 12 तासांत गंगापूरला 52, त्र्यंबकला 29, आंबोलीला 49, गौतमीला 35, कश्यपीला 28 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा च्या भिंतीजवळ 12 तासांत 20 मिमी, भाम 31 मिमी, भावली 48 मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरी, घोटीलाही दमदार पाऊस झाला.

गंगापुर 4947 क्यूसेक, कडवा 6216 क्यूसेक, भावली 948 क्यूसेक, पालखेड 4956 क्यूसेक, पुणेगाव 1568 क्यूसेक, ओझरखेड 1602 क्यूसेक, दारणा 13250 क्यूसेक, गौतमी गोदावरी 500 क्यूसेक, कश्यपि 1000 क्यूसेक, वालदेवी 1305 क्यूसेक, भाम 2248 क्यूसेक, भोजापूर 540 क्यूसेक, आळंदी 1262 क्यूसेक.

नगर-नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा 41 टीएमसी म्हणजे 52 टक्के झाला आहे. 31 जुलैपर्यंत घाटमाथ्यावर पर्जन्यवृष्टी होण्यास अनुकूल स्थिती असल्याने उपयुक्त पाणीसाठा 50 टीएमसी म्हणजे 65 टक्के निश्चितपणे होईल. त्यामुळे यावर्षी समन्यायीप्रमाणे जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ येणार नाही. घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असली तरी पर्ज्यन्यछायेतील लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी भुजल पातळीत वाढ झालेली नाही. जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा येत्या दोन दिवसात 65 टक्क्यांवर पोहचणार आहे. या पार्श्वभूमीवर कालवे प्रवाहित केले तर लाभक्षेत्रातील भुजल पातळीत वाढ होऊन रब्बी हंगामासाठी ते उपयुक्त राहिल
– उत्तमराव निर्मळ,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...