ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून, शेतातील द्राक्षसह टोमॅटो, सोयाबीन तसेच सर्व भाजीपाला पिकांचे (Crops) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गापुढे हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यात पाऊस (Rain) पडत असल्याने सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. अति पाऊस पडत असला तरी बळीराजाने खरीप हंगामातील सर्वच पिके मोठ्या मेहनतीने घेतली. मात्र, अतिपाऊस व पडलेले बाजार भाव यामुळे बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली असून, याच दिवाळी सणाच्या दिवशी बळीराजाच्या शेतात मावेना इतका पाऊस पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये (Nashik District) खरीप हंगामामध्ये टोमॅटो पिक मोठया प्रमाणावर घेतले जाते.सध्या टोमॅटोचा (Tomato) हंगाम चालू आहे, मात्र टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खर्च केलेले भांडवल वसूल झालेले नसल्याने रब्बी हंगामात कसे उभे राहायचे यांची चिंता शेतकरी वर्गामध्ये दिसून येत आहे. त्यात गेल्या सहा महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चालू हंगामात ५० टक्के द्राक्ष वेलीवर घडच निघाले नसल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न उभा राहिला आहे.
त्याचप्रमाणे मे महिन्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) कांदा (Onion) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेला कांदा शेतातच खराब झाला. तर साठवून ठेवलेल्या कांद्याला दिवाळी झाली तरी भाव मिळालाच नाही. त्यामुळे कांदा, टोमॅटो,द्राक्ष व सोयबीन ही सर्व पिके बाजारभाव नसल्याने तर काही पावसाने वाया गेली आहे. प्रत्येक हंगामामध्ये हवामान बदलाचा शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, शेतकरी मात्र कर्जबाजारी होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अतिपावसाने पिके वाया गेली असताना तसेच पिकांचे पंचनामे चालू असताना काही बँकांकडून मात्र कर्ज वसुलीचा तगादा चालू आहे.
दरम्यान, त्यामुळे संपूर्ण शेती व्यवसाय धोक्यात आला असून, तरूण पिढी शेती व्यवसायात येण्यास तयार होत नाही. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. सहकारी संस्थांचे कर्ज थकले असून, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव होण्याच्या तयारीत आहे. तर राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर जप्तीचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. त्यामुळे शेतकरी राजकीय व्यवस्था व नैसर्गिक संकटांपुढे हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.




