Thursday, October 8, 2026
HomeनाशिकMP Rajabhau Waje : संयुक्त राष्ट्रांत घुमला नाशिकचा आवाज; खासदार वाजेंनी मांडली...

MP Rajabhau Waje : संयुक्त राष्ट्रांत घुमला नाशिकचा आवाज; खासदार वाजेंनी मांडली भारताची सामाजिक विकासाची भूमिका

नाशिक | Nashik

संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेच्या (UNGA-81) Third Committee मध्ये ‘Social Development’ या विषयावर झालेल्या चर्चेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी भारताच्या वतीने आपली भूमिका मांडली. जगातील विविध देशांच्या प्रतिनिधींसमोर भारताच्या सामाजिक विकासाची वाटचाल आणि भविष्यातील आव्हानांबाबत त्यांनी आपले विचार मांडले. सामाजिक विकासाचा विषय हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसून सामान्य नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी, सुविधा आणि सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे खासदार वाजे यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

- Advertisement -

भारताच्या (India) सामाजिक विकासाचा आढावा घेताना त्यांनी डिजिटल आणि आर्थिक समावेशन, अन्नसुरक्षा, आरोग्य सुविधा, परवडणारी घरे, गरिबी निर्मूलन आणि कामगारांचे सामाजिक संरक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना आर्थिक व्यवस्थेशी जोडण्याचे प्रयत्न तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार याकडे त्यांनी लक्ष वेधले.

देशातील (Country) मोठ्या संख्येने नागरिक असंघटित क्षेत्रात काम करतात. या कामगारांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेशी जोडणे ही महत्त्वाची गरज असल्याचे सांगताना खासदार वाजे यांनी e-Shram Portal आणि कामगारांसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा उल्लेख केला. आरोग्य, अन्न, निवारा आणि रोजगार यांसारख्या मूलभूत गरजांकडे केवळ कल्याणकारी योजनांच्या दृष्टीने नव्हे, तर मानवी विकासाचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘विकसित भारत @ 2047’च्या संदर्भात भूमिका

‘विकसित भारत @ 2047’ या संकल्पनेचा उल्लेख करताना भारताचा विकास हा सर्व घटकांना सोबत घेऊन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी मांडले. विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे, सामाजिक विषमता कमी करणे आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळणे याला प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

नाशिकच्या खासदाराची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भूमिका

विरोधी पक्षाचा खासदार म्हणून देशातील सामाजिक प्रश्नांकडे रचनात्मक आणि लोककेंद्री दृष्टिकोनातून पाहत, भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी खासदार राजाभाऊ वाजे यांना मिळाली. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर भूमिका मांडल्याने नाशिकच्या दृष्टीनेही हा विशेष क्षण ठरला आहे. “जगाच्या व्यासपीठावर भारताची भूमिका मांडताना देशाच्या सामाजिक विकासातील प्रगतीसोबतच पुढील आव्हाने आणि अधिक समावेशक विकासाची गरजही सातत्याने लक्षात घेतली पाहिजे,” अशी भूमिका खासदार वाजे यांनी मांडली.

ताज्या बातम्या

Nashik Pothole News : कामासाठी खोदलेला खड्डा ठरला जीवघेणा! ६१ वर्षीय...

0
इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर शहरभर सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी रस्ते खोदले जात असताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....