नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीचे मतदान अवघे दोन दिवसांवर येऊन ठेपले असून, महायुतीमध्ये (Mahayuti) एकमेकांना डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. काल (सोमवारी) रात्री नवीन नाशकातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत शिवसेनेचे (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची व्हिडिओची चित्रफित दाखवली होती. या चित्रफितीत हे कार्यकर्ते ड्रग्ज सेवन करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना अडवून घेराव घालत सभेमध्ये दाखविण्यात आलेला व्हिडिओ आणि फोटो खोटा असल्याचा व्हिडिओत दिसणार्या तरुणांच्या पालकांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची
त्यानंतर काल (सोमवारी) रात्रीच प्रभाग क्रमांक ११ मध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उमेदवार समाधान आहिरे यांच्यावर प्रचारादरम्यान थेट बंदूक ताणून धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आहिरे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागात प्रचारासाठी फिरत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्यासमोर बंदूक काढून “प्रचाराला फिरायचे नाही” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत बंदुक ताणणाऱ्या युवकाला पकडले. यानंतर संतप्त जमावाने त्याला चोप देत नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. बंदुक ताणणारा युवक हा कारागृहातून निवडणूक लढवत असलेले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. या दोन्ही घटनांमुळे नाशकातील वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले आहे.




