नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक महापालिकेची निवडणूक चार सदस्य प्रभाग रचनेप्रमाणेच होणार आहे. याबाबतचे आदेश आज सायंकाळी नाशिक महापालिकेला प्राप्त झाले असून त्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 2017 ची निवडणूक देखील चार सदस्य प्रभाग रचनेनुसार झाली होती. यावेळी नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली होती.
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने मंगळवारी (दि.१०) जारी केले आहेत. मुंबई महापालिका वगळून अ ब व क दर्जाच्या महापालिका मध्ये ही चार सदस्य प्रभाग रचना करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यात ब वर्गात नाशिक महापालिकेच्या देखील समावेश आहे. शहरातील प्रभाग संख्या वाढून नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचना जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे होईल. सरासरी लोकसंख्या ठरविण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले प्रभागातील सदस्य संख्या हे सूत्र वापरले जाईल. प्रभागाची लोकसंख्या सरासरीच्या १० टक्के कमी-जास्त असू शकते; अपवादात्मक कारणांसह यापेक्षा जास्त असू शकते.दरम्यान महानगरपालिका आयुक्त प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करतील आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करतील. यानंतर हरकती-सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर होईल.
प्रभागांचे नकाशे गुगल अर्थवर तयार होऊन, प्रगणक गट, लोकसंख्या आणि सीमा स्पष्ट दर्शविल्या जातील. ही प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य राहावी, यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश आहेत. गोपनीयता भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 2017 साली भाजपने नाशिक महापालिकेवर एक हाती सत्ता काबीज केली होती. मात्र तीन वर्षांपासून पालिकेत प्रशासक राजवट सुरु आहे. मात्र महापालिका निवडणूक कधी होणार याकडे सर्व पक्षीयांच्या नजरा लागल्या होत्या अखेर याप्रकरणी राज्य शासनाने मंगळवारी महापालिका प्रशासनला प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. यानंतर सर्व पक्षीयामध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.
देशदूतचे वृत्त घरे ठरले
नाशिक महापालिका निवडणूक चार सदस्य प्रभाग रचनेप्रमाणे होणार अशी बातमी देशदूतने मंगळवारी प्रसिद्ध केली होती. तसेच आदेश आज शासनाने काढल्याने देशदूतचे वृत्त खरे ठरले.




