नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
तालुक्यातील मन्याड चौकी येथून आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण (Kidnapping) झाल्याच्या घटनेचा तपास सुरू असतानाच, या प्रकरणातील एका संशयिताने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१९ सप्टेंबर) रोजी उघडकीस आली. श्रावण दामू मोरे (३५)असे आत्महत्या केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत जबर मारहाण झाल्यामुळेच मोरे यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप करत कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन मांडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकी घटना काय?
मन्याड चौकी येथील शेतमजूर मच्छिंद्र सुरेश मोरे यांची आठ महिने वयाची मुलगी तनू हिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात (Nandgaon Police Station) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण झालेल्या बालिकेचा शोध घेत असताना पोलिसांनी तपासअंती श्रावण दामू मोरे आणि अन्य एका नागरिकाला संशयित म्हणून शुक्रवारी (दि.१८) ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर शुक्रवारीच त्यांना सोडून देण्यात आले होते. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर शनिवारी सकाळी श्रावण मोरे यांनी एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.
नांदगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांचा ठिय्या
श्रावण मोरे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात (Nandgaon Rural Hospital) धाव घेऊन बराच वेळ ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी चौकशीदरम्यान श्रावण यांना जबर मारहाण केली होती, त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला. घटनास्थळी आणि रुग्णालयात अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी तातडीने भेट दिली. पोलिसांनी पीडित कुटुंबीयांची समजूत काढून मध्यस्थी केल्यानंतर अखेर कुटुंबीयांनी मृतदेह (Dead Body) ताब्यात घेतला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




