नाशिक | Nashik
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) नांदगाव बुद्रुक येथे आठवडे बाजारात विक्रीस असलेल्या भेळ भत्त्यातून तब्बल १४० जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. बाधितांमध्ये नांदगाव बुद्रुकसह चिंचावड, गुंजाळवाडी आणि डोंगरगाव येथील ग्रामस्थांचा समावेश आहे. सुदैवाने, सर्व रुग्णांना (Patients) वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
भेळ खाल्ल्यानंतर जुलाब, उलटी आणि ताप
नांदगाव बुद्रुक गावात भरलेल्या आठवडे बाजारात परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. बाजारातील (Market) एका स्थानिक दुकानदाराकडून खरेदी केलेला भेळ भत्ता खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना मळमळ, पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाला. एका पाठोपाठ एक अनेक नागरिकांना विशेषतः लहान मुलांना त्रास होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली. ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांद्वारे सर्व बाधितांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.
खासगी डॉक्टरांची मदतीसाठी धाव, वेळेवर उपचारांमुळे संकट टळले
सरकारी रुग्णालयात एकाच वेळी १४० हून अधिक रुग्ण दाखल झाल्याने सुरुवातीला मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहरातील अनेक खासगी डॉक्टरांनी सामाजिक भान जपत थेट सरकारी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी सरकारी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले. रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. मोमीन यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणीही गंभीर नाही. वैद्यकीय पथक सर्व रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे सांगितले.
मंत्री दादा भुसे रुग्णालयात, सखोल चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून धीर दिला. तसेच उपस्थित आरोग्य यंत्रणेला रुग्णांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार करण्याचे कडक निर्देश दिले.नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करत मंत्री भुसे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) संबंधित विक्रेत्याच्या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे.




