त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील (Nashik-Trimbakeshwar Road) महिरावणी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेतील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा (Student) नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.जालीधर वामन टोपले (वय १६, रा. राजेवाडी, जि. नाशिक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवार (दि.४) रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आश्रमशाळेत असताना जालीधर याला अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच शाळेचे अधीक्षक चव्हाण आणि जालीधरचे वडील वामन टोपले यांनी त्याला तात्काळ नाशिक (Nashik) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यान मंगळवार (दि.५) रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली किरवे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. रुग्णालयातून अकस्मात मृत्यूचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (BNS) अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




