पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
म्हसरूळ परिसरातील (Mhasrul Area) रामेश्वर नगर येथे एका भीषण घटनेत गोठ्यातील १९ म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप अमन अफजल कुरेशी व त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून, याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुरेशी कुटुंबाचा (Kureshi Family) सुमारे ५० म्हशींचा गोठा असून, गोठ्यावरून विद्युत वाहिनी गेली आहे. या ठिकाणी वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने कुटुंबीयांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी विद्युत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर विभागाकडून केबल बदलण्यात आली. मात्र ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
(दि. २०) रोजी गोठ्यालगतच्या विद्युत खांबावर शॉर्टसर्किट होऊन वायर तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडली. पत्रे लोखंडी असल्याने संपूर्ण गोठ्यात करंट पसरला आणि त्यात १९ म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या. या वेळी अमन कुरेशी गोठ्यात उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून मीटरमधून वीजपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र वायर खंबावरूनच शॉर्ट झाल्याने त्याचा उपयोग झाला नाही. दरम्यान, घटनेनंतर विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता, ही चूक मीटरमधील असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुरेशी कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, पुरावे लपवण्यासाठी तुटलेली वायर हटवण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नगरसेविका दिपाली गीते यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व विद्युत विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचनामा व पशुवैद्यकीय तपासणीतही म्हशींचा मृत्यू विजेच्या धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, कुरेशी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये (Citizen) संतापाची लाट उसळली असून, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ अपघात नसून विद्युत विभागाच्या (Electrical Department) निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





