नाशिक | Nashik
२०२७ साली नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वाहतूक कक्षाने २९ ऑनस्ट्रीटसह ६ ऑफस्ट्रीट अशा ३५ वाहनतळांचा समावेश असलेला आराखडा तयार केला आहे. काही दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी शहरातील पार्किंगच्या जागांची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या होत्या. मनपाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे एकाच वेळी ४ हजार ८६५ वाहने पार्क (Parking) करता येणार आहे.
दरम्यान या वाहनतळांसाठी मनपाने दरही निश्चित केले असून दुचाकीसाठी पाच, चारचाकीसाठी दहा, तर टेम्पो वा बस यासारख्या वाहनांसाठी वीस रुपये प्रतितास दर राहणार आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. शहरातील प्रामुख्याने बाजारपेठेचा परिसर असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार, पंचवटी कारंजा, शालिमार सीबीएस, त्र्यंबकनाका, महात्मानगर, कॉलेजरोड आदी भागांत वाहन पार्किंगसाठी जागाच उड्डाणपुलावर भीषण अपघात (Accident) झाल्यानंतर संपूर्ण शहरामधील वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला.
नाशिकचे पालकमंत्री नियुक्त होऊन थांचवलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तातडीने नाशिकमध्ये धाव घेत महापालिका, पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या काळात प्रलंबित राहिलेल्या स्मार्ट पार्किंगचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रॅफिक सेलने आराखडा तयार केला असून, कोणत्या बाहनतळावर किती वाहने एका बसू शकतील तसेच त्यांच्याकडून साधारणपणे किती भाडे आकारणी केली जावी, त्यासाठी मॉडेल तयार केले जात आहे.
ऑनस्ट्रीट पार्किंग अशी
कुलकर्णी गार्डन साधू वासवानी रोड, कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल ऑफिस, ज्योती स्टोअर ऋषिकेश हॉस्पिटल ते गंगापूर नाका, प्रमोद महाजन उद्यान प्रवेशद्वार, गंगापूर नाका ते जेहान सर्कल दोन्ही बाजूने, जेहान सर्कल ते गुरुजी हॉस्पिटल, जहान सर्कल ते एबीबी सर्कल, गुरुजी हॉस्पिटल ते पाइपलाइन रोड, मोडक पॉइंट ते खडकाळी रोड, थत्तेनगर रोड, कुलकर्णी उद्यानामागे, श्रद्धा पेट्रोलपंप ते बेस्टसाइड मॉल, सीबीएस ते शालिमार, कॅनडा कॉर्नर ते विसे मळा, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर, मॉडेल कॉलनी चौक ते भोसला गेट, पंडित कॉलनी पालिका इमारत, शालिमार ते नेहरू गार्डन, एचडीएफसी चौक ते एमएसईबी ऑफिस, छत्रपती शिवाजी पुतळा ते डॉ. आंबेडकर पुतळा नाशिक रोड, महात्मा गांधी रोड, कॅनडा कॉर्नर ते पॅनासॉनिक गॅलरी, बिटको सिग्रल ते महात्मा गांधी रोड, जेहान सर्कल ते नेलींकर सर्कल, शहीद सर्कल ते मॉडेल कॉलनी सर्कल, पशुवैद्यकीय दवाखाना तर ऑफस्ट्रीट पार्किंग मध्ये बीडी भालेकर शाळा मैदान, अण्णा शास्त्री, मेन रोड, अंगोरा कॉम्प्लेक्स, शताब्दी हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.