Monday, October 26, 2026
HomeनाशिकNashik ZP News : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून नव्या आयुष्याची सुरुवात; 'नवचेतना' अभियानातून...

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून नव्या आयुष्याची सुरुवात; ‘नवचेतना’ अभियानातून पाच एकल महिलांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा थाटात संपन्न

मंत्री झिरवाळ, खा. भगरे, आ. खोसकरांसह जिल्हाधिकारी आणि ZP सीईओ पवारांनी धरला संबळाच्या तालावर ठेका

नाशिक | Nashik

एकल महिलांना सन्मान, आत्मविश्वास आणि नव्या आयुष्याची संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, नाशिकच्या वतीने थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Omkar Pawar) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या नवचेतना अभियानांतर्गत पाच एकल महिलांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात पाच महिलांनी वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात केली. सामाजिक रूढी-परंपरांच्या पलीकडे जाऊन एकल महिलांना सन्मानाने जगण्याची संधी देणारा हा उपक्रम पुरोगामी महाराष्ट्राच्या (Maharashtra) सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना बळ देणारा ठरला.

- Advertisement -

या सोहळ्यास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार किशोर दराडे, आमदार सरोज आहिरे, उपमहापौर विलास शिंदे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

एकल महिलांबाबतचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक – झिरवाळ

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी समाजात आजही एकल महिलांना वेगळेपणाची वागणूक दिली जात असल्याची खंत व्यक्त केली. ही मानसिकता बदलून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणे आवश्यक आहे. या दिशेने जिल्हा परिषद, नाशिकने केलेला पुढाकार कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना बळ देणारा उपक्रम – भुसे

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हा परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. एकल महिलांना नव्या आयुष्याची संधी देण्याबरोबरच समाजात समानता आणि सन्मानाची भावना रुजविण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विवाहबद्ध झालेल्या सर्व दाम्पत्यांना सुखी, समाधानी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक विचारांना पुढे नेणारा हा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन – जिल्हाधिकारी प्रसाद

नवचेतना अभियानांतर्गत एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि समाजाला नवी दिशा देणारा आहे. या उपक्रमाची संकल्पना मांडून तिची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांचा संदेश

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नवचेतना अभियानाची भूमिका स्पष्ट करत एकल महिलांना सामाजिक, आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विवाह सोहळ्यास दिलेल्या शुभेच्छांचे यावेळी त्यांनी वाचन केले, एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता यावे, त्यांना स्वावलंबनाची संधी मिळावी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा, या उद्देशाने अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी भारतातील पुनर्विवाह चळवळीचा संदर्भ देत ही चळवळ काही काळ खंडित झाल्यानंतर आता नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिला नव्याने गती मिळत असल्याचे सांगितले. एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेणारा हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्य

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुनर्विवाह केलेल्या ग्रामीण भागातील महिलांच्या अपत्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या बचतपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य खरेदी करता यावे, यासाठी प्रत्येक जोडप्याला ३१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या आर्थिक सहाय्यामुळे नवदाम्पत्यांना नवीन संसाराची सुरुवात करताना आधार मिळणार आहे.नवचेतना अभियानाच्या माध्यमातून एकल महिलांना केवळ शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि नव्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद, नाशिककडून केला जात आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून या प्रयत्नांना मानवी संवेदना आणि सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.

नवचेतना अभियानांतर्गत विवाह झालेल्या जोडप्यांची नावे

१. कल्याणी संजय पगार – योगेश बापू आहेर, रा. बगडू, ता. कळवण.

२. विजया हिम्मत देवरे – शशिकांत दादाजी देवरे, ता. बागलाण.

३. सुरेखा धैर्यशील बोरस्ते – सुदाम रामनाथ लोहकर, रा. तळेगाव, ता. दिंडोरी.

४. अनुप्रिता हेमंत बोराळे – मयूर दिलीप जोशी, रा. नानेगाव, नाशिक.

५. ज्योती एकनाथ बागुल – राम वामन कांबळे, रा. पाथर्डी, नाशिक.

ताज्या बातम्या

Nashik : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक l प्रतिनिधी Nashik राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे...