पंचवटी | मनोज निकम | Panchvati
आस्था आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या रामकुंड व लक्ष्मण कुंडात (Ramkund and Laxman Kund) सध्या दूषित पाण्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुंडातील पाण्यात किडे पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, भाविकांच्या आरोग्याचाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तरीही भक्तिभावातून भाविक येथे स्नान करत असून काहीजण हेच पाणी पवित्र मानून प्राशन करत आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध कामे सुरू असली, तरी मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर टीका होत आहे.
विशेष म्हणजे, २००३-०४ च्या कुंभमेळ्यात रामकुंड परिसरात सुमारे ८ कोटी रुपये खर्चुन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पाद्वारे कुंडातील पाणी शुद्ध करून पुन्हा वापरले जात होते. लाखो भाविकांच्या स्नानामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा महत्वाकांक्षी उपक्रम मानला गेला होता. मात्र निर्माल्य आणि पूजेच्या साहित्यामुळे पाइपलाइन वारंवार चोकअप होणे, तसेच देखभालीचा अभाव यामुळे हा प्रकल्प लवकरच बंद पडला.
सध्या या प्रकल्पाचे (Project) केवळ गंजलेले अवशेषच परिसरात उभे आहेत. कोट्यवधींचा खर्च करूनही हा प्रकल्प टिकू न शकल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, रामकाल पथाचे काम देखील रखडले असून, येत्या पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव आणि दुर्लक्ष स्पष्ट दिसत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. रामकुंड व लक्ष्मण कुंडातील पाण्याची तातडीने स्वच्छता करून प्रभावी जलशुद्धीकरण यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
घाट सुशोभीकरणावर भर, पण जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष?
महानगरपालिकेकडून सध्या घाट परिसरात सुशोभीकरण, लाईटिंग, दगडी, कोट्यावधी रुपयांची रंगरंगोटी, बांधकाम व पर्यटन वाढविणाच्या कामांवर मोठा भर दिला जात आहे. विशेषतः रामकुंड व गोदावरी घाट परिसरात सौदर्थीकरणामुळे दृश्यात्मक बदल दिसत असला तरी मूलभूत प्रश्न कायम आहेत. वास्तवात अप्रक्रियित सांडपाणी अजूनही नदीत मिसळत असल्याच्या तक्रारी आहे. काही एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची स्थिती, ड्रेनेज लाईनमधील गळती व अनधिकृत जोडण्याबाचत स्थानिक नागरिकांचे मते ‘घाट सुंदर झाले, पण पाणी स्वच्छ नाही तर त्याचा उपयोग काय? आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने जलशुद्धीकरण हा अधिक महत्त्वाचा मुद्दा, आगामी कुंभमेळा लक्षात घेता, लाखो भाविक नदीत स्नान करणार अशावेळी पाण्याची गुणवत्ता सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्प नेमका कुठे गेला, है आजतागायत कोडंच राहिलं आहे. अवघ्या तीन महिन्यांतच प्रकल्प गुंडाळला गेला, तो आजही सुरू असता, तर रामकुंड आणि लक्ष्मण दुधात किडे पडल्याची वेळ आली नसती. हजारो कोटींच्या घोषणा करूनही गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी प्रत्यक्षात मात्र काहीच होताना दिसत नाही.
देवांग जानी अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती




