नाशिक | Nashik
मालेगावहून नाशिकच्या ( Malegaon to Nashik) दिशेने जाणाऱ्या एका ट्रेलरने रेणुका देवी मंदिर घाटात (Renuka Devi Temple Ghat) अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विविध कारखान्यांसाठी अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला ५० हून अधिक टायर आहेत. घाट उतरताना अचानक इंजिनने पेट घेतल्याने वाहनाच्या चालक व इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रसंगावधानाने ट्रेलरचे इंजिन वेगळे करून काही अंतरावर आणून उभे केले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
चालकाच्या तात्काळ निर्णयामुळे ट्रेलरवर (Trailer) ठेवलेली महत्त्वाची अवजड यंत्रसामग्री आगीपासून वाचवण्यात यश आले. मात्र, इंजिनचा भाग जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमाटोल कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, ट्रेलरवरील अवजड मशीन महामार्गावर अडकून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस आणि सोमाटोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बचावकार्य केले. तर आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी (Citizen) त्याचे कौतुक केले आहे.